वयाच्या ८० व्या वर्षी चिमुकल्यांना मोफत ज्ञानदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:37 IST2021-02-25T04:37:36+5:302021-02-25T04:37:36+5:30
पारडगाव : मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी, यासाठी पारडगाव (ता. घनसावंगी) येथील ८० वर्षीय शेषराव विठोबा धुमाळे मोफत शिक्षण देत ...

वयाच्या ८० व्या वर्षी चिमुकल्यांना मोफत ज्ञानदान
पारडगाव : मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी, यासाठी पारडगाव (ता. घनसावंगी) येथील ८० वर्षीय शेषराव विठोबा धुमाळे मोफत शिक्षण देत आहेत. गत अनेक वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम सुरू असून, या उपक्रमामुळे कोरोनाच्या काळात मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबले आहे.
कोरोनामुळे गतवर्षीपासून प्राथमिक शाळा बंद आहेत. यामुळे मुलांचे मोठे नुकसान हाेत आहे. परंतु, पारडगाव येथील मुलं याला अपवाद ठरत आहेत. गावातील शेषराव धुमाळ हे वयाच्या ८० व्या वर्षीही लहान मुलांना मोफत शिक्षण देत आहेत. दिवसातील दोन तास ते मुलांचा अभ्यास घेण्यासाठी देत आहेत. गावातील अनेक मुलं धुमाळ यांच्याकडे अभ्यासासाठी येतात. कोरोनातील सूचनांचे पालन करून ते मुलांना ज्ञानदान करीत आहेत. कविता, पाढे, लेखन कौशल्य आदींवर त्यांनी भर दिला आहे. एकीकडे कोरोनामुळे शाळा बंद असली, तरी शेषराव धुमाळ यांनी राबविलेल्या या उपक्रमामुळे मुलांना लाभ होत असून, पालकांनाही दिलासा मिळाला आहे.
चौकट
माझे वडील स्वातंत्र्यसेनानी होते. लहान वयात मुलांची बुद्धी चांगली असते आणि ते चांगले ज्ञानार्जन करू शकतात. कोरोनात मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मी तास-दोन तास लेखन, वाचन घेऊन त्यांचा अभ्यास घेतो. शाळा सुरू होईपर्यंत आपण हा उपक्रम सुरू ठेवणार आहोत.
शेषराव धुमाळ, पारडगाव