जिल्ह्यातील चार रक्तपेढ्या ऑक्सिजनवर; आठ दिवस पुरेल एवढाच साठा उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:31 IST2021-04-04T04:31:12+5:302021-04-04T04:31:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम एकूणच जनजीवनावर झाला आहे. रक्तदान करणारे युवक-युवती ...

जिल्ह्यातील चार रक्तपेढ्या ऑक्सिजनवर; आठ दिवस पुरेल एवढाच साठा उपलब्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम एकूणच जनजीवनावर झाला आहे. रक्तदान करणारे युवक-युवती कोरोनाच्या भीतीमुळे पुढे येत नसल्याने हा रक्तसाठा घटला आहे. जिल्ह्यातील चारही रक्तपेढ्यांमध्ये आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे.
कोरोनाचे लसीकरण सुरू झाल्यानंतर रक्तदान शिबिरावर मर्यादा आल्या आहेत. लस घेतल्यानंतर पुढील अठ्ठावीस दिवस रक्तदान न करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. त्याचा मोठा फटका रक्तपेढ्यांना बसला असल्याची माहिती देण्यात आली.
हा रक्ताचा साठा वाढावा म्हणून सर्वच रक्तपेढ्यांनी युवक-युवती तसेच सर्व नागरिकांना आवाहन केले आहे. शासकीय आणि खासगी रक्तपेढ्यांनीदेखील वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
शासकीय रक्तपेढीत आठ दिवसांचाच साठा
जालना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये आजघडीला केवळ पन्नास रक्ताच्या पिशव्या आहेत. यामध्ये अत्यंत आणीबाणीच्या वेळी हे रक्त रुग्णांना देण्यात येणार आहे. एकूणच रक्तदान शिबिरांसाठी नियमित रक्तदान करणाऱ्या संस्थांशी आम्ही संपर्क साधून आहोत. त्यामुळे लवकरच हा रक्ताचा तुटवडा भरून निघेल, असा विश्वास आहे. रक्तदात्यांनीही स्वत:हून पुढे येण्याची गरज आहे.
- पद्मजा सराफ, अतिरिक्त शल्यचिकित्सक, जालना
जनकल्याण रक्तपेढी
जालना येथील जनकल्याण रक्तपेढीतही अत्यल्प रक्तसाठा आहे. परंतु, हा रक्तसाठा वाढविण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. अनेकजण यासाठी पुढाकार घेत असून, लवकरच ही समस्या सुटेल.
- पुसाराम मुंदडा, संचालक
स्वामी समर्थ रक्तपेढी
गेल्या अनेक वर्षांपासून गरजूंसाठी आमची रक्तपेढी तत्पर असते. परंतु, सध्या रक्तदात्यांकडून शिबिर होत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.
- प्रकाश भांगे, सचिव
थॅलेसेमियाला प्राधान्य
जालना जिल्ह्यात जवळपास १५० पेक्षा अधिक थॅलेसेमिया या आजाराचे रुग्ण आहेत. त्यांना दर महिन्याला रक्त पुरवावे लागते. त्यामुळे या रुग्णांसाठी आम्ही नियमित रक्तदान करतो. - मिलिंद लांबे
लसीकरणाआधी करा रक्तदान
कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम गतीने राबविली जात आहे. त्यामुळे रक्तदानावर याचा परिणाम झाला आहे. पंरतु, नागरिकांनी लसीकरणाचे कारण देण्याऐवजी लसीकरणाला जाण्याच्या तीन ते चार दिवस आधी रक्तदान केल्यास कुठलीच अडचण येत नाही. आजघडीला मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. यावर उपाय म्हणून केवळ जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करणे हाच आहे. त्यासाठी आमचे विशेष प्रयत्न सुरु आहेत. याला प्रतिसाद मिळेल असा विश्वास आहे.
- गणेश चौधरी