आधार लिंकिंग न केल्यास अन्नपुरवठा होणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:41 IST2021-01-08T05:41:10+5:302021-01-08T05:41:10+5:30
आर. बसय्ये : तहसील कार्यालयात पुरवठा विभागाची बैठक मंठा : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांचा आधार क्रमांक व मोबाइल क्रमांक ...

आधार लिंकिंग न केल्यास अन्नपुरवठा होणार बंद
आर. बसय्ये : तहसील कार्यालयात पुरवठा विभागाची बैठक
मंठा : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांचा आधार क्रमांक व मोबाइल क्रमांक ३१ जानेवारीपर्यंत ई- पॉश मशीनशी लिंक करावा, अन्यथा पुढील महिन्यापासून धान्य पुरवठा बंद होईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी आर. एम. बसय्ये यांनी दिला आहे.
मंठा तहसील कार्यालयात बुधवारी शासकीय अन्न पुरवठा विभागाची बैठक झाली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी बसय्ये या बोलत होत्या. शासन निर्देशानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व एपीएल योजनेतील व अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकेतील सर्वच लाभार्थ्यांचे मोबाइल क्रमांक व आधार कार्ड लिंक करण्याचे केंद्र शासनाचे निर्देश आहेत. या अनुषंगाने मंठा तालुक्यातील ९५ टक्के लाभार्थ्यांचे आधार कार्ड लिंक झाले आहे. यासाठी स्वस्त धान्य दुकानातील ई- पॉस उपकरणातील इ- केवायसीद्वारे मोबाइल क्रमांक व आधार क्रमांक लिंक करण्याचे प्रमाण वाढवण्यात येत आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील लाभार्थ्यांचे १०० टक्के आधार व मोबाइल लिंक करण्यासाठी पुरवठा विभागाकडून ३१ जानेवारीपर्यंत मोहीम राबविण्यात येत आहे.
जानेवारी २०२१ चे धान्य वाटप करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्याचा आधार व मोबाइल लिंक नसल्यास लाभार्थ्यांनी नजीकच्या स्वस्त धान्य दुकानदारांकडून मोबाइल नंबर व आधार नंबर लिंक करून घ्यावे, असेही यावेळी सूचित करण्यात आले.
ई- केवायसी लिंक करून वापरण्याची कार्यप्रणाली स्वस्त धान्य दुकानदारांना कळवण्यात आली आहे. ज्या शिधापत्रिकेवर मागील तीन महिन्यात धान्य उचलण्यात आले नाही, अशा सर्व शिधापत्रिका तात्पुरत्या निलंबित करण्यात येतील किंवा धान्य अनुदान नसलेल्या योजनेत वर्ग करण्यात येणार आहेत, तर अन्नधान्य लाभासाठी अशा शिधापत्रिकाधारकाच्या कुटुंब प्रमुखाने तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतरच कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार लिंक करूनच सदर शिधापत्रिका पात्र योजनेखाली समाविष्ट करण्यात येणार आहे.
चौकट
ज्या शिधापत्रिकेवर तीन महिने धान्य उचलण्यात आलेले नाही, अशा शिधापत्रिका जानेवारीनंतर कायमस्वरूपी निलंबित करण्यात येणार आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी ताबडतोब मोबाइल व आधार नंबर लिंक करून घ्यावे, असेही आर. एम. बसय्ये यांनी म्हटले आहे. यावेळी जिल्हा सहायक पुरवठा अधिकारी व्ही. व्ही. महिंद्रकर, मंठा तहसीलदार सुमन मोरे, पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार ए. ए. सय्यद यांच्यासह जिल्हा समन्वयक रवि मिसाळ, नंदु क्षीरसागर व मंठा तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांची उपस्थिती होती.