दुर्लक्ष : आदेशाच्या अंमलबजावणीचा अभाव !
अमोल राऊत
तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथील स्विट मार्ट, हॉटेल व खानावळीत उघड्यावर खाद्यपदार्थ तळविले जात असून, निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाचा सर्रास वापर सुरू आहे. या गंभीर प्रकाराकडे अन्न व औषधी प्रशासनाचे दुर्लक्ष पाहायला मिळत आहे.
तळणी परिसरातील देवठाणा, गारटेकी, दूधा, उस्वद , पेवा - नरडव , दहिफळ खंदारे, नायगाव, ठोकसाळ, वैद्य वडगाव, चौफुली, जयपूर यांसह मंठा-तळणी-लोणार राष्ट्रीय महामार्गावर अनेक हॉटेल्स, खानावळी, धाबे, खाद्यपदार्थ विक्रेते, हातगाड्यांवर उघड्यावर खाद्यपदार्थ तळले जात आहेत. त्याचबरोबर तेलाचा सर्रास पुनर्वापर सुरू आहे. शिल्लक तेलातच नवीन तेल ओतून, त्याचा वापर करून खाद्यपदार्थ तळले जातात. वडे, भजी, कचोरी, समोसे, पुरी-भाजी, मच्छी व चिकन ६५ यांसह अनेक पदार्थ अशा तेलात तळून विकले जातात. यामुळे पोटाचे आणि किडनीचे आजार बळावतात. कॅन्सरचाही धोका असतो, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. असे असले तरी याकडे अन्न व औषध प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे निखिल कुलकर्णी म्हणाले की, खाद्यतेलाचा पुनर्वापर करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
अन्न व औषध प्रशासनाचे कायम दुर्लक्ष
अन्न व औषध प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्विट मार्ट, हॉटेल, धाबे, खानावळी, नाष्टा व भेळ सेंटर उघड्यावर खाद्यपदार्थ तळतात. खाद्यतेलाचा सर्रास पुनर्वापर सुरू असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. फूड सेफ्टी स्टँडर्ड अॅथॉरिटीच्या सूचनेनुसार खाद्यतेल पुनर्वापरावर अन्न-औषध मंत्रालयाने १ मार्च १९१९ पासून निर्बंध आणणारे आदेश जारी केले असले, तरी या आदेशाची ग्रामीण भागात काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही.