सूचनांचे पालन, ग्रामसंरक्षण दलामधील युवकांच्या प्रयत्नातून खासगाव कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:33 IST2021-08-28T04:33:41+5:302021-08-28T04:33:41+5:30
प्रकाश मिरगे जाफराबाद : गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी ग्रामसंरक्षण दलाच्या युवकांनी घातलेली गस्त, ग्रामपंचायतीने केलेले नियोजन आणि ...

सूचनांचे पालन, ग्रामसंरक्षण दलामधील युवकांच्या प्रयत्नातून खासगाव कोरोनामुक्त
प्रकाश मिरगे
जाफराबाद : गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी ग्रामसंरक्षण दलाच्या युवकांनी घातलेली गस्त, ग्रामपंचायतीने केलेले नियोजन आणि त्याला ग्रामस्थ, प्रशासनाची मिळालेली साथ यांमुळे खासगाव (ता. जाफराबाद) हे गाव कोरोनामुक्त झाले आहे.
खासगावाची तशी ओळख आमदार संतोष दानवे यांनी दत्तक घेतलेले गाव अशी आहे. त्यांच्या माध्यमातून गावात अनेक विकासाभिमुख योजना राबविल्या आहेत. कोरोनाकाळात अशा मोठ्या वस्तीच्या गावात उपाययोजना करणे तसे काम कसरतीचे होते. ८३५ कुटुंबसंख्या व ५ हजार २०० लोकसंख्येच्या गावात ग्रामसंसद कार्यालयाने अचूक नियोजन केले. त्यांनी स्थापन केलेल्या ग्रामसंरक्षण दल, सर्वपक्षीय मंडळी व ग्रामस्थांच्या एकजुटीने गावाने कोरोनावर मात केली आहे. याच कामगिरीमुळे हे गाव ‘कोरोना’मुक्त गाव स्पर्धा योजनेत तालुक्यातील १०१ गावातून प्रथम आले आहे. गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत.
सर्वांचे प्रयत्न...
आमदारांनी दत्तक घेतलेल्या गावाला कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामस्थांची भूमिका महत्त्वाची ठरली.
ग्रामपंचायत, आरोग्य विभागासह राजकीय पदाधिकाऱ्यांनीही याबाबत मोठे परिश्रम घेतले आहेत.
ग्रामपंचायतीने असे केले प्रयत्न
गावस्वच्छतेवर भर देऊन निर्जंतुकीकरण करण्यात आले. चेकपोस्टवर गावात येणाऱ्यांची तपासणी करण्यात आली.
बाधितांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्यात आला. वेळोवेळी सर्वेक्षण करून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
गावातील बाधितांची संख्या ३५ वर गेल्याने गाव हॉटस्पॉट ठरू लागले होते. परंतु, ग्रामपंचायतीने केलेल्या उपाययोजना आणि त्याला ग्रामस्थ व सर्वपक्षियांची मिळालेली साथ यांमुळे गाव कोरोनामुक्त झाले. कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- संतोष लोखंडे, सरपंच
कोरोना काळात गावात चेकपोस्ट तयार करून गावात येणाऱ्यांची चौकशी आणि तपासणी करण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गावात उपाययोजना राबविण्यात आल्या. जनजागृती आणि आरोग्य तपासणीवरही अधिक भर दिला.
- राजीव पिंपळे, ग्रामसेवक
ग्रामपंचायत, सर्वपक्षीय पदाधिकारी, ग्रामस्थांच्या सहकार्यातून गाव कोरोनामुक्त झाले आहे. बाधितांच्या संपर्कातील नागरिकांचा वेळेवर शोध घेऊन गरजेनुसार उपचार करण्यात आले. आता लसीकरण वेळेत पूर्ण व्हावे, यावर भर देण्यात आला आहे.
- डॉ. अजय बोर्डे, वैद्यकीय अधिकारी