Follow-up to the center for free vaccines to needy; If there is any problem, the state government is capable - Rajesh Tope | गरजूंना मोफत लसीसाठी पाठपुरावा; काही अडचण आली तर राज्य सरकार सक्षम - राजेश टोपे

गरजूंना मोफत लसीसाठी पाठपुरावा; काही अडचण आली तर राज्य सरकार सक्षम - राजेश टोपे

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात राज्यासाठी १७.५० लाख डोस आवश्यक आहेत. आजवर ९.८० लाख डोस प्राप्त झाले आहेत.

जालना : कोरोना लसीकरणाचा आज ऐतिहासिक क्षण आहे. आज दिली जाणारी लस मोफत दिली जात असून, लसीकरणातील शेवटच्या लाभार्थ्यांना मोफत लस मिळावी यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. दारिद्र्य रेषेखालील गरजूंना मोफत लस मिळावी अशी इच्छा असून यात काही अडचण आली तर राज्य सरकार यासाठी सक्षम असल्याची ग्वाही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

जालना येथील जिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यास शनिवारी सुरुवात झाली. मार्च २०२० पासून आजतागायत कोरोनामुळे सर्वसामान्यांचे हाल झाले. या काळात आरोग्य विभागासह इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या कामामुळे कोरोना नियंत्रणात राहिला. राज्यात आज कोरोना लसीकरणास प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात स्वच्छता कर्मचारी, जेष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यासाठी १७.५० लाख डोस आवश्यक आहेत. आजवर ९.८० लाख डोस प्राप्त झाले आहेत. उर्वरित डोस लवकर उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विशेषतः दारिद्रय रेषेखालील सर्वाना मोफत लस मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे टोपे यांनी सांगितले. राज्यातील सर्व गरजूंना लस मिळेल, कोणालाही राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाहीसुद्धा टोपे यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा शल्य चिकित्सक अर्चना भोसले, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांच्या सह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

पद्मजा सराफ यांना दिली लस
जालना जिल्हा रुग्णालयात आयोजित लसीकरण शिबिरात निवासी वैद्यकीय अधिकारी पद्मजा सराफ यांना कोरोनाची लस देण्यात आली. जिल्हा रुग्णालयासह अंबड, परतूर, भोकरदन येथे ही लसीकरण सुरू आहे.

Web Title: Follow-up to the center for free vaccines to needy; If there is any problem, the state government is capable - Rajesh Tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.