जालना : अवेळी पडणारा पाऊस आणि वातावरणातील बदलांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यात शेतकऱ्यांकडून कमी दराने भाजीपाल्याची खरेदी केली जात असली तरी बाजारपेठेत त्याचे दर वाढल्याचे दिसून येत आहे.
शेतकरी अडचणींवर मात करीत भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. उत्पादित भाजीपाला बाजारपेठेत विक्रीस नेण्यास शेतकऱ्यांची सोय होत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी हे भाजीपाला व्यापाऱ्यांना विक्री करतात. शेतकऱ्यांकडून किलोवर, क्रेटवर खरेदी केला जाणारा भाजीपाला हा ग्राहकांना पेंडीवर विक्री केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादित माल पाच रुपयांना दोन पेंडी मिळत असेल तर बाजारपेठेत पाच रुपयांना एक पेंडीप्रमाणे विक्री केला जातो. याचा फटका सर्वसामान्यांना बसतो आणि शेतकऱ्यांनाही भाजीपाल्याला अपेक्षित दर मिळत नाही.
शेतकऱ्यांचा खर्चही निघेना...
शेती करताना आज एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सर्व अडचणींवर मात करीत आम्ही भाजीपाल्याचे उत्पादन घेतो. परंतु, उत्पादित माल विक्रीसाठी काढल्यानंतर केलेला खर्चही आमच्या हाती पडत नाही.- शेतकरी
वातावरणातील बदल आणि कोरोनामुळे शेती व्यवसायाला फटका बसला आहे. त्यात रोगराईचा सामनाही शेतकऱ्यांना करावा लागतो. विविध अडचणींवर मात करून भाजीपाला उत्पादित केला तर त्याला अपेक्षित दर मिळत नाही. - शेतकरी
ग्राहकांना परवडेना
कोरोनामुळे आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली आहे. त्यात खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल, किराणाच्या दरात वाढ झाली आहे. त्यात आता दैनंदिन गरजेचा असलेला भाजीपालाही दैनंदिन महागत असल्याचे दिसत आहे. - सूरज सातपुते
शेतकऱ्यांकडून कमी दराने खरेदी केलेला भाजीपाला व्यापारी अधिक दराने विक्री करतात. त्यात दरामध्ये भाजीपाला विक्री करण्यासाठी येणाऱ्यांचे दर बाजारपेठेपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. - कृष्णा फुटाणे
भावात एवढा फरक का?
व्यापाऱ्यांना शेतातील कोथिंबिरीसह भाजीपाला काढण्यासाठी मजुरावर खर्च करावा लागतो. त्याची वाहतूक विविध ठिकाणी करावी लागते. या सर्व बाबींवर खर्च वाढतो. त्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या दरामध्ये मोठा फरक दिसून येत आहे.