तळणीत साडेपाच लाखांचे वायर लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:31 IST2021-01-03T04:31:26+5:302021-01-03T04:31:26+5:30
तळणी : पोलीस चाैकीसमोर हाकेच्या अंतरावर असलेल्या एका दुकानातील पाच लाख ५५ हजार रुपयांचे तांब्याचे वायर चोरट्यांनी लंपास केले. ...

तळणीत साडेपाच लाखांचे वायर लंपास
तळणी : पोलीस चाैकीसमोर हाकेच्या अंतरावर असलेल्या एका दुकानातील पाच लाख ५५ हजार रुपयांचे तांब्याचे वायर चोरट्यांनी लंपास केले. ही घटना ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री मंठा तालुक्यातील तळणी येथील पोलीस चौकीसमोरील भागात घडली.
तळणी येथील पोलीस चौकीसमोर काही अंतरावर शेषराव गणेशराव सरकटे यांचे विजय मोटार रिवायंडिंगचे दुकान आहे. चोरट्यांनी ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री हे दुकान फोडून आतील पाच लाख ५५ हजार रुपयांचे तांब्याचे वायर लंपास केले. मात्र, मंठा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांनी घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता उशिराने घटनास्थळाची पाहणी करून गुन्हा दाखल केल्याचा आरोप तक्रारदार शेषराव सरकटे यांनी केला आहे.
घटनेचे गांभीर्य नाही
३१ डिसेंबरच्या रात्री मोठी चोरी झाल्यानंतर मंठ्याचे पोलीस निरीक्षक विलास निकम यांनी १ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पाहणीनंतर चोरीबाबत तपासाची चक्रे फिरविण्याऐवजी गावात चहापाणी घेण्यात धन्यता मानल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
पथकाकडून पाहणी
२ जानेवारी रोजी दिवसभरात श्वानपथक, फिंगर तपासणी व सीसीटीव्ही तपासणी पथकाकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. मात्र, घटनेचा तपास उशिराने सुरू केल्यामुळे तपासणीत काहीच निष्पन्न झाले नसल्याचे तळणीचे माजी सरपंच दिलीपराव सरकटे यांनी सांगितले.