अंबड (जि. जालना) : हॉटेलच्या वादातून झालेल्या गोळीबारात किशोर कुमार गायकवाड (वय ३५, रा. शिंदेनगर, अंबड) हे जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री अंबड-पाचोड मार्गावरील कैकाडी महाराज चौकात घडली. या प्रकरणात गणेश बाबूराव खरात (रा. म्हाडा कॉलनी, अंबड) याच्याविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबड शहरातील रहिवासी किशोर गायकवाड व त्यांचे सहकारी सोमवारी रात्री ९:३० वाजता अंबड-पाचोड मार्गावरील कैकाडी महाराज चौकातील एका दुकानासमोर थांबले होते. त्यावेळी तेथे आलेल्या गणेश खरात याने तू ते हॉटेल चालविण्यास का घेतले, असा जाब विचारला. त्यावेळी किशोर गायकवाड याने पोटापाण्यासाठी हॉटेल चालवावे लागणार असल्याचे सांगितले. त्यावेळी खरात याने अचानक पिस्तूल काढत गायकवाडकडे रोखले. गायकवाड याने गोळीबार होतेवेळी पिस्तूलला हात लावल्याने गोळी गायकवाडच्या मांडीला लागली. त्यावेळी तेथे उपस्थित सहकाऱ्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याचे गायकवाड याने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
जखमी किशोर गायकवाडच्या फिर्यादीवरून गणेश खरात याच्याविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. गोळीबारानंतर फरार झालेल्या खरातचा शोध सुरू असल्याचे अंबड पोलिसांनी सांगितले.