लाच मागणा-या पोलीस कॉन्स्टेबलवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:30 IST2018-02-10T00:30:08+5:302018-02-10T00:30:21+5:30
गुन्हा दाखल न करता गाडी सोडविण्यासाठी २५ हजारांची लाच मागणा-या पोलीस कॉन्स्टेबलवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाच मागणा-या पोलीस कॉन्स्टेबलवर गुन्हा
जालना : गुन्हा दाखल न करता गाडी सोडविण्यासाठी २५ हजारांची लाच मागणा-या पोलीस कॉन्स्टेबलवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देविदास जाधव असे लाच मागणा-या पोलीस कर्मचा-याचे नाव असून, तो सध्या उपविभागीय पोलीस अधिका-यांच्या पथकात कार्यरत आहे.
या प्रकरणातील तक्रारदार नांदेड येथील रहिवासी असून, चुकीची नंबर प्लेट लावल्यामुळे त्यांची कार जाधव याने सदर बाजार पोलीस ठाण्यात लावली होती. तक्रारदाराने कागदपत्रे दाखविल्यानंतरही जाधव याने गुन्हा दाखल न करता, गाडी सोडविण्यासाठी व जेलमध्ये न पाठविण्यासाठी लाचेची मागणी केली होती. मात्र तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीने लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता, जाधवने २५ हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीचे पोलीस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक व्ही.एल. चव्हाण, कर्मचारी अशोक टेहरे, अमोल आगलावे, संजय उदगीरकर, रामचंद्र कुदर, रमेश चव्हाण, संदीप लव्हारे, टेहरे, म्हस्के, खंदारे यांनी ही कारवाई केली.