शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची क्रीडा प्रबोधिनीसाठी आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:30 IST2021-01-20T04:30:42+5:302021-01-20T04:30:42+5:30
जालना : जिल्हा परिषदेद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता क्रीडा प्रबोधिनी हा निवासी उपक्रम राबवत आहे. या उपक्रमासाठी फंड कमी पडत ...

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची क्रीडा प्रबोधिनीसाठी आर्थिक मदत
जालना : जिल्हा परिषदेद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता क्रीडा प्रबोधिनी हा निवासी उपक्रम राबवत आहे. या उपक्रमासाठी फंड कमी पडत आहे. जिल्ह्यातील शिक्षक विद्यार्थ्यांसाठी मदतीला धावून आले आहेत. प्रशासनाच्या आवाहन पत्रानुसार जानेवारी, २०२१ च्या वेतनातून प्रति शिक्षक १,००० रुपये देणार आहेत.
जिल्हा परिषद शेष फंडातून व मानव विकास कार्यक्रमांतर्गत नावीन्यपूर्ण जिल्हा योजनेतून जालना जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेतील ८ ते १४ वयोगटातील ५० मुले व मुलीसाठी निवासी क्रीडा प्रबोधनी १७ जून, २०१९ पासून जिल्हा परिषद जालना येथे सुरू करण्यात आलेले असून, तो प्रयोगत्वावर राबविला जात आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकत असलेल्या मुला-मुलींना क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडाविषयक नैपुण्य दाखविण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावी, या हेतूने निवासी क्रीडा प्रबोधिनी सुरुवात करण्यात आली आहे. मानव विकास अंतर्गत उपलब्ध फंडातून जिल्हा परिषद मुलाची येथे निवासी क्रीडा प्रबोधिनीकरिता इमारत बांधकाम प्रगतिपथावर असून, जानेवारी, २०२१ अखेर इमारत पूर्ण होणार आहे. मानव विकास कार्यक्रमांतर्गत नावीन्यपूर्ण योजनेतून इमारत बांधकामासाठी निधी मंजूर असून, मुलांच्या राहण्यासाठी, जेवणाची व्यवस्था, क्रीडा मार्गदर्शकांना मानधन, कार्यालय खर्च जिल्हा परिषद दरवर्षी शेष फंड व समाज सहभागातून खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दरवर्षी रुपये ७२ लक्ष एवढा खर्च अपेक्षित आहे. तथापि, जिल्हा परिषद शेष फंडातून मंजूर रकमेची मर्यादा लक्षात घेता, जिल्हा परिषदेला प्राप्त होणाऱ्या अनुदानाशिवाय लोकसहभाग माध्यमातून निधी जमा करण्याचा मानस आहे. यामुळे जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनीतील मुलांना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देता येतील. निवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये शिकणारी मुलेही जिल्हा परिषद शाळेतील असून याच जिल्ह्यातील आहेत.
त्यांना आधुनिक व्यायाम शाळा साहित्य आणि उत्तम दर्जाचे सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्यामुळे, अल्पावधित निवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर कबड्डी स्पर्धेत तिरुपती (आंध्र प्रदेश) येथे राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत व दहा मुलांनी राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. विभागीय स्तर व राज्य स्तरावरील स्पर्धेमध्ये प्रबोधन बहुतेक सर्व मुलांनी सहभाग नोंदविला आहे. यापुढे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जालना जिल्ह्यात नाव उज्ज्वल होण्यासाठी क्रीडा प्रबोधिनीमुळे हे शक्य होणार आहे. जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणारे सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षण विभागातील अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक यांना जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी एक विशेष पत्र काढून १,००० रुपये मदत जानेवारी महिन्याच्या वेतनातून देण्याचे आवाहन केले आहे.
स्वेच्छेने आर्थिक मदत
ग्रामीण विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात नैपुण्य दाखविण्याची संधी मिळाली आहे. या विद्यार्थ्यांना फंड कमी पडत असून, जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक यांनी सामाजिक जबाबदारीने दायित्व घेऊन स्वेच्छेने मदत करीत असल्याचे प्रहारचे संतोष राजगुरू म्हणाले.