अखेर सोमठाणा धरणातून कालव्याला पाणी सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:27 IST2020-12-23T04:27:07+5:302020-12-23T04:27:07+5:30
बदनापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या पिकांना पाणी देण्यासाठी कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन ...

अखेर सोमठाणा धरणातून कालव्याला पाणी सोडले
बदनापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या पिकांना पाणी देण्यासाठी कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन पाटबंधारे विभागाने सोमठाणा धरणातून कालव्याला पाणी सोडले आहे. यामुळे धोपटेश्वर, बदनापूर व देवगाव शिवारातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
बदनापूर तालुक्यात मागील काही वर्षांपासून पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले होते. यंदा मात्र जूनच्या सुरूवातीपासूनच तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसाने पिके जोमात आली होती. अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असले तरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण झाला होता. सोमठाणा, आन्वा, राजेवाडी येथील धरणे भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते.
मुबलक पाणीसाठ्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांची पेरणी केली आहे. सध्या पिकेही जोमात आली असून, पिकांना पाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे सोमठाणा धरणातून कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे अहवाल पाठविला असता वरिष्ठांनी या अहवालाला मंजुरी दिली आहे. त्यानंतर धरणाखालील शेतकऱ्यांनी फी भरली असल्याने पाटबंधारे विभागाने कालव्याला पाणी सोडले आहे. या पाण्याचा रब्बी हंगामातील पिकांना फायदा होणार आहे.
यंदा सोमठाणा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार धरणातून शनिवारी कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी अनधिकृत पाण्याचा वापर करू नये, केवळ नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनीच या पाण्याचा फायदा घ्यावा. अनधिकृत पाण्याचा वापर करताना कोणी आढळल्यास कारवाई केली जाईल.
-विराज बोधने, उपअभियंता