...अखेर पिंपळगाव रेणुकाई- भोकरदन रस्त्याची डागडुजी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:25 IST2021-01-04T04:25:52+5:302021-01-04T04:25:52+5:30
पारध : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई ते भोकरदन या राज्य मार्गावरील रस्त्याची डागडुजी करण्यास अखेर प्रारंभ झाला आहे; परंतु ...

...अखेर पिंपळगाव रेणुकाई- भोकरदन रस्त्याची डागडुजी सुरू
पारध : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई ते भोकरदन या राज्य मार्गावरील रस्त्याची डागडुजी करण्यास अखेर प्रारंभ झाला आहे; परंतु रस्त्याची डागडुजी न करता रस्त्याचे नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांसह परिसरातील ग्रामस्थांमधून होत आहे.
भोकरदन- पिंपळगाव रेणुकाई हा रस्ता विदर्भ व मराठवाड्याला जोडला जाणारा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. या रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्यादेखील अधिक आहे. मागील अनेक वर्षांपासून या २२ किलोमीटर रस्त्याची मोठी दुरवस्था झाली होती. रस्त्यावर जागोजागी मोठाले खड्डे पडलेले असल्याने या भागातील नागरिकांना प्रशासकीय कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी मोठी कसरत करत भोकरदन गाठावे लागत होते. रस्त्याचे काम होण्याबाबत विविध सामाजिक संघटनांनी शासन दरबारी निवेदने दिली होती. अनेकांनी रास्ता रोको करून आंदोलनेही केली होती. तत्कालीन लोकप्रतिनिधींनीही या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने रस्त्याचा प्रश्न कायम प्रलंबित राहिला होता. आ. संतोष दानवे यांनी जनतेच्या प्रश्नांची दखल घेत शासनाकडून मोठा निधी आणून रस्त्याचे काम करण्यात आले होते; परंतु काम झाल्यानंतर काही महिन्यांतच या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले होते. पुढील टप्प्याचे काम सुरू होण्यापूर्वीच मागील रस्त्याचे काम खराब होत होते. जुई धरण फाट्यापासून सुरू झालेले हे काम अद्याप पिंपळगाव रेणुकाईपर्यंत पोहोचले नाही, तेच मागील झालेले काम हे पूर्णपणे खराब झाले होते. नागरिकांनी रस्त्याच्या कामाबाबत वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन आता रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
चौकट
वर्षभरापूर्वी शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च करून टप्पा पद्धतीने रस्त्याचे काम पूर्ण केले होते. यावेळी संबंधित ठेकेदाराने कामात गुणवत्ता न राखल्याने वर्षभरातच या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. याबाबत २७ डिसेंबर रोजी ‘लोकमत’मध्ये ‘भोकरदन- पिंपळगाव रेणुकाई रस्त्याची दुरवस्था’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील चार दिवसांपासून जुई धरण फाट्यापासून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे.
फोटो ओळ : पिंपळगाव रेणुकाई ते भोकरदन रस्त्यावर करण्यात येत असलेली डागडुजी.