अखेर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या सूचना - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:32 IST2021-04-09T04:32:12+5:302021-04-09T04:32:12+5:30
‘लोकमत’च्या बातमीचा परिणाम : जालना : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने ...

अखेर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या सूचना - A
‘लोकमत’च्या बातमीचा परिणाम :
जालना : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने काही निर्बंध लावले आहेत. परंतु, प्रशासनाकडून कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात नसल्याचे समोर आले होते. याबाबत ‘लोकमत’ने ३ एप्रिलच्या अंकात ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा विसर : पॉझिटिव्हच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचणीकडे दुर्लक्ष’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दररोज ४५० ते ५०० रुग्ण आढळत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु, नागरिक नियमांकडे कानाडोळा करीत आहेत. दुसरीकडे प्रशासनाचाही हलगर्जीपणा दिसून येत आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी केली जात नाही. प्रशासनाला कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा विसर पडल्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत पालकमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. या वेळी टोपे म्हणाले, कोरोनाबाधितांच्या संपर्कामधील सहवासीतांचा अचूकपणे शोध घेऊन त्यांचे अलगीकरण करण्यावर भर देण्यात यावा. साधारणपणे एका बाधित व्यक्तीच्या संपर्कातील २० व्यक्तींचा शोध घेण्यात येऊन त्यांचे तातडीने अलगीकरण करण्यात यावे. कोरोनाबाधितांच्या सहवासीतांचा डेटा नियमितपणे अपलोड होईल, यादृष्टीने काळजी घेण्याचे निर्देशही पालकमंत्री टोपे यांनी या वेळी दिले.