कचरेवाडी-खणेपुरी रस्त्याचे साइटपंखे भरण्याचे काम कासवगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:01 IST2021-02-05T08:01:38+5:302021-02-05T08:01:38+5:30
राज्यमार्ग : अपघाताची भीती जालना : तालुक्यातील महत्त्वाचा समजला जाणारा जालना ते ममदाबाद या राज्यमार्गावरील कचरेवाडी ते खणेपुरी दरम्यानच्या ...

कचरेवाडी-खणेपुरी रस्त्याचे साइटपंखे भरण्याचे काम कासवगतीने
राज्यमार्ग : अपघाताची भीती
जालना : तालुक्यातील महत्त्वाचा समजला जाणारा जालना ते ममदाबाद या राज्यमार्गावरील कचरेवाडी ते खणेपुरी दरम्यानच्या रस्त्याचे साइट पंखे भरण्याचे काम कासवगतीने सुरू आहे. यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली आहे. तातडीने साइट पंखे भरण्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्याचे साइट पंखे भरण्याचे काम थांबविण्यात आले होते. आता लॉकडाऊन शिथिल झाल्याने साइट पंखे भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हा रस्ता खणेपुरी, भाटेपुरी, कारला, ममदाबाद, वडिवाडी व हातवन येथील नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे साइट पंखे भरण्याचे काम सुरू करण्यात आले होते, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे काम बंद करण्यात आले होते. आता काही दिवसांपासूनच हे काम सुरू करण्यात आले, परंतु साइट पंखे भरण्याचे काम कासवगतीने होत असल्याने, वाहनधारकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. सकाळी दूध व भाजीपाला विक्रेते घाईने वाहने चालवून शहराकडे येतात. त्यांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. जालना-ममदाबाद हा महत्त्वाचा रस्ता असून, जालना व घनसावंगी या दोन मतदार संघात हा रस्ता विभागाला आहे. याकडे पालकमंत्री व आरोग्यमंत्री राजेश टोपे व आ.कैलास गोरंट्याल यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.