नुकसान अनुदानापासून पन्नास टक्के शेतकरी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:05 IST2021-02-05T08:05:38+5:302021-02-05T08:05:38+5:30
आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना व परिसरातील बहुतांश सर्वच शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते; परंतु शासनाच्या अनुदानापासून या भागातील ...

नुकसान अनुदानापासून पन्नास टक्के शेतकरी वंचित
आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना व परिसरातील बहुतांश सर्वच शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते; परंतु शासनाच्या अनुदानापासून या भागातील अर्ध्याहून अधिक शेतकरी अद्याप वंचित आहेत.
भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील सरासरी १,३०० शेतकरी नुकसान अनुदानास पात्र आहेत. पैकी काही शेतकऱ्यांची खाती ही जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहेत, तर ५० टक्के शेतकऱ्यांची खाती ही ग्रामीण बँकेत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे; परंतु ग्रामीण बँकेत खाते असलेल्या एकाही शेतकऱ्याला अद्याप लाभ मिळालेला नाही. त्यामुळे ग्रामीण बँकेतील लाभधारक शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. विशेषत: लाभार्थी शेतकरी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे विचारणा करून बँकेत चकरा मारत आहेत; परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
कोट
नुकसान अनुदानासाठी पाठपुरावा करूनही काही उपयोग होत नाही. अनुदान मिळत नसल्याने मला रुग्णालयात जाऊन पायाचे उपचार करता येत नाहीत. त्यामुळे आजार बळावत असून, उत्पन्नाचे इतर साधनही आमच्याकडे नाही.
-गंजीधर गावंडे, शेतकरी
शेतकऱ्यांच्या नुकसान अनुदानाच्या याद्या तहसीलमध्ये जमा करण्यात आल्या आहेत. माझ्या वतीने मी शेतकरऱ्यांच्या अनुदानाची यादी शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत दिलेली आहे.
-श्रीकृष्ण कुलकर्णी, तलाठी
तहसील कार्यालयाकडून चेकसह याद्या पंधरा दिवसांपूर्वी आलेल्या आहेत. एक- दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करून तिचे वाटप केले जाईल.
-दळवी, बँक अधिकारी