शेतकऱ्याचा मुलगा बनला सीए
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:56 IST2021-02-18T04:56:55+5:302021-02-18T04:56:55+5:30
घनसावंगी : दुष्काळामुळे शेतातून उत्पन्न मिळत नसल्याने घरची स्थिती हालाखीची. मात्र, तरीही शिक्षण घेताना येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करीत ...

शेतकऱ्याचा मुलगा बनला सीए
घनसावंगी : दुष्काळामुळे शेतातून उत्पन्न मिळत नसल्याने घरची स्थिती हालाखीची. मात्र, तरीही शिक्षण घेताना येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करीत आंतरवाली दाई (ता. घनसावंगी) येथील विकास पद्माकर काळे सीए परीक्षेत यश संपादीत केले आहे. ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबातील विकासच्या प्रेरणादायी यशाचे ग्रामस्थ कौतुक करीत आहेत.
शेतकरी कुटुंबातील विकास काळे याचे गावातीलच जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण झाले. पानेवाडीतील शाळेतून दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने औरंगाबादेत शिक्षणासाठी जाण्याचा मार्ग निवडला. घरची स्थिती हालाखीची असल्याने औरंगाबदसारख्या शहरात राहून शिक्षण घेताना विकासला एक ना अनेक अडचणी आल्या. मेस लावण्यासाठी पैसे नसल्याने त्याने हाताने स्वयंपाक करून अभ्यास केला. उच्च शिक्षण पूर्ण होईल की नाही याची चिंता विकासला हेाती. परंतु, दोन्ही भावांनी खाजगी नोकरी करून घर संभाळताना विकासला शिक्षणाची प्रेरणा दिली. त्याने सीएचे शिक्षण द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया येथे पूर्ण केले. तर आर्टिकलशिप सीए एस. बी. देशमुख यांच्याकडे पूर्ण केली. विकासने नोव्हेंबर २०२० मध्ये सीएच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिली आणि या परीक्षेत त्याने अत्यंत घवघवीत यश मिळवले. ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबातील असलेला न्यूनगंड बाजूला ठेवून नियोजनबद्ध पध्दतीने आणि जिद्दीने मिळविलेले विकासचे हे यश इतर युवकांसाठी प्रेरणादायी असेच आहे.
आई रूग्णालयात असताना दिली परीक्षा
विकासची सीएची परीक्षा सुरू होती. त्याचवेळी त्याची आई उषा काळे यांना पॅरालिसिसचा आजार झाला. आईला अचानक रूग्णालयात न्यावे लागले. एकीकडे परीक्षा आणि दुसरीकडे रूग्णालयात असलेली आई अशा द्विधा मनस्थितीत विकास होता. परंतु, कुटुंबातील सदस्यांनी आधार दिल्यानंतर त्याने सीएची परीक्षा दिली. ही आठवण सांगताना त्याच्या डोळ्यात आश्रू तरळले होते.
कुटुंबाने दिली प्रेरणा
वडील पद्माकर काळे, आई उषा काळे, बंधू लक्ष्मण काळे, सतीश काळे तसेच, प्रिती काळे, निकीता काळे या कुटुंबातील सदस्यांनी वेळोवेळी प्रेरणा दिल्याने आणि वेळोवेळी गुरूजनांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आपण यशस्वी झाल्याचे विकास सांगतो. युवकांनी मनातील न्यूनगंड बाजूला ठेवून अभ्यास केला तर यश नक्की मिळते, असे तो म्हणाला.