सावकारांकडून शेतकऱ्यांनी घेतले सव्वासात कोटींचे कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:42 IST2021-01-08T05:42:23+5:302021-01-08T05:42:23+5:30
जालना जिल्ह्यात अवैध सावकारी मोठ्या प्रमाणात चालते. शेतकऱ्यांच्या शेतीचे खरेदीखत करून घेणे, कोऱ्या धनादेशावर स्वाक्षऱ्या घेणे, इसार पावती करून ...

सावकारांकडून शेतकऱ्यांनी घेतले सव्वासात कोटींचे कर्ज
जालना जिल्ह्यात अवैध सावकारी मोठ्या प्रमाणात चालते. शेतकऱ्यांच्या शेतीचे खरेदीखत करून घेणे, कोऱ्या धनादेशावर स्वाक्षऱ्या घेणे, इसार पावती करून घेणे, ई-करार करून घेवून शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. अनेक सावकार व्याजासह पैसे परत मिळाल्यानंतरही शेतकऱ्यांना जमिनी परत करत नसल्याच्या तक्रारी जिल्हा निबंधक (सावकारी) यांच्याकडे दाखल होतात. अधिकृत सावकारांकडून होणारी लूट पाहता काहींनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेण्यावर भर दिला आहे. जिल्ह्यात १११ परवानाधारक सावकार आहेत. या सावकारांकडून जिल्ह्यातील १३ हजार १४८ शेतकरी, व्यावसायिकांनी तब्बल ७ कोटी ३३ लाख ९८ हजार रूपयांचे कर्ज घेतले आहे. यात जालना शहर व तालुक्यात सर्वाधिक ६३ सावकार आहेत. त्यांच्याकडून १२ हजार ६४२ जणांनी ६ कोटी ६७ लाख ४९ हजार रूपयांचे कर्ज घेतले आहे.
अधिकृत सावकारांची व्याजदर आकारणी
अधिकृत सावकारांकडून तारण कृषी कर्ज घेतल्यास वर्षाला नऊ टक्के, बिगरतारणसाठी १२ टक्के, बिगर कृषी तारण कर्जासाठी १५ टक्के आणि बिगर कृषी बिगर तारणसाठी १८टक्के व्याजदर आकारला जातो.
वर्षात ८८ आत्महत्या
नापिकी, डोक्यावरील कर्जाला कंटाळून जिल्ह्यातील ८८ शेतकऱ्यांनी चालू वर्षात आत्महत्या केल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज मिळत नसल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी सावकारांच्या दारात उभे राहत आहेत. असंख्य अनधिकृत सावकार मनमानी पध्दतीने व्याज आकारून किंवा जमीन नावे करून घेत कर्ज देत आहेत.
अनधिकृत सावकारी
जिल्ह्यात अनधिकृत सावकारकी करणाऱ्यांची कमी नाही. आजवर जिल्ह्यातील १२ सावकारांविरूध्द ७ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. तर शेतकऱ्यांच्या येणाऱ्या तक्रारीनुसार जिल्हा उपिनबंधक (सवाकारी) विभागाकडून सावकारांच्या घर, दुकानांवरही धडक कारवाईची मोहीम राबिवली जात आहे.
जिल्ह्यातील अधिकृत सावकार
१११
शेतकऱ्यांनी गेल्या वर्षभरात जिल्ह्यात मृत्यूला कवटाळले
८८