भोकरदन : येथील बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीच्या शाखेतील शिपायाने कार्यालयातच कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान घडली. प्रदीप जाधव ( 32 ) असे शिपायाचे नाव असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील वाकडी येथील प्रदीप जाधव भोकरदन येथील बुलढाणा अर्बनच्या शाखेत शिपाई म्हणून कामास आहेत. काही कारणास्तव तणावात येतून जाधव याने मंगळवारी ( दि. 6 ) शाखा अधिकारी जोशी यांच्याकडे राजीनामा दिला होता. त्यानंतर बुधवारी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान जाधव याने बँकेत येत शाखाधिकारी जोशी यांना माझा राजीनामा वरच्या ऑफिसमध्ये का पाठविला म्हणून विचारणा केली. दोघांमध्ये बोलणे सुरु असतानाच जाधव याने अचानक सोबत आणलेले कीटकनाशक प्राशन केले. या प्रकारामुळे बँकेत एकाच खळबळ उडाली. बँकेतील कर्मचाऱ्यांनी जाधव यास भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
येथे प्राथमिक उपचार करून त्यास पुढील उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. तर शाखाधिकारी जोशी यांना संपर्क साधला असता त्यांनी, मी गडबडीत आहे नंतर माहिती सांगतो असे सांगितले.