बॅंकेवरील निर्बंधास मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:31 IST2021-05-20T04:31:58+5:302021-05-20T04:31:58+5:30
राजूर येथे बॅंकेसमोर गर्दी वाढली राजूर : येथील बॅंक ऑफ इंडिया शाखेत पैसे काढण्यासाठी मंगळवारी सकाळपासूनच ग्रामस्थांनी गर्दी केली ...

बॅंकेवरील निर्बंधास मुदतवाढ
राजूर येथे बॅंकेसमोर गर्दी वाढली
राजूर : येथील बॅंक ऑफ इंडिया शाखेत पैसे काढण्यासाठी मंगळवारी सकाळपासूनच ग्रामस्थांनी गर्दी केली होती. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. अनेकजण विनामास्क रांगेत उभे होते. परिसरात नागरी वस्ती असल्याने बॅंकेच्या वतीने नियोजन करण्याची गरज आहे.
मुरमाच्या ढिगाऱ्यामुळे वाहतुकीला अडथळा
पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई ते करजगाव या रस्त्यावर मुरूमाचा ढिगारा पडलेला आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असून, वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वी पिंपळगाव रेणुकाई ते करजगाव या रस्त्याचे डांबरीकरण झाले. त्यानंतर या रस्त्याची डागडुजी करण्यात आली. या कामानंतर रस्त्याच्या दुतर्फा टाकण्यासाठी मुरूम आणण्यात आला. महिना उलटूनही हा मुरूम रस्त्याच्या मध्यभागी पडलेला आहे.
परतूर येथे शनिवारी रक्तदान शिबिर
परतूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा लक्षात घेता पोलीस प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. दरम्यान, परतूर पोलीस ठाण्याच्या वतीने शनिवारी रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी दिली.
अंतरवाली सराटी येथे हातपंप दुरूस्ती
जालना : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील पाणी पुरवठा करणाऱ्या वीजपंपाच्या रोहित्राचे केबल जळाल्याने गावातील पाणीपुरवठा बंद आहे. त्यातच हातपंप अनेक महिन्यांपासून नादुरूस्त होते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने पुढाकार घेत सोमवारी हातपंप दुरूस्तीचे काम करण्यात आले. यावेळी सरपंच देविदास डोंगरे, उपसरपंच मीराबाई तारख, ग्रामविकास अधिकारी सुरेश धोत्रे यांनी पाठपुरावा केला.
अनुदान काढण्यासाठी शेतकऱ्यांची बँकेत गर्दी
अंबड : पीएम किसान योजनेसह इतर शासकीय योजनांचे अनुदान काढण्यासाठी शेतकऱ्यांची जिल्हा बँकेत गर्दी होत आहे. या गर्दीत सुरक्षित अंतराच्या नियमाला तिलांजली दिली जात आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. संबंधितांनी लक्ष देऊन या गर्दीवर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी होत आहे.
अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी
अंबड : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे. तळीरामांमुळे भांडण- तंट्यात वाढ होत असून, महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय युवा पिढी व्यसनाधीन होत आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाने अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महिला वर्गातून केली जात आहे.
दिशादर्शक फलक नसल्याने गैरसोय
परतूर : शहराला जोडणाऱ्या प्रमुख मार्गासह ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यात या मार्गावरील दिशादर्शक, सूचना फलक गायब झाले आहेत. त्यामुळे चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. ही बाब पाहता बांधकाम विभागाने गरजेनुसार सूचना फलक, दिशादर्शक फलक बसवावेत, अशी मागणी होत आहे.
सुरक्षित अंतराच्या नियमांचे उल्लंघन
बदनापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा सकाळी ११ पर्यंत सुरू आहेत. मात्र, याच कालावधीत शहरातील बाजारपेठेत गर्दी होत आहे. विनामास्क फिरणारे नागरिक सुरक्षित अंतराच्या नियमांना तिलांजली देत व्यवहार करीत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे.
विस्कळीत वीजपुरवठा, वीज ग्राहकांची गैरसोय
भोकरदन : शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. थोडेही वारे सुटले तरी वीज गुल होत आहे. अचानक वीज जात असल्याने उकाड्याने त्रस्त झालेले अबाल-वृद्ध हैराण होत आहेत. विजेअभावी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी संबंधितांनी लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.
बंद पडलेले पथदिवे सुरू करण्याची मागणी
घनसावंगी : शहरांतर्गत विविध भागातील पथदिवे बंद पडले आहेत. पथदिवे बंद पडल्याने रात्रीच्या वेळी रस्ता शोधताना पादचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. शिवाय भुरटे चोरटेही रात्रीच्या अंधाराचा फायदा उचलत आहेत. ही बाब पाहता नगरपालिका प्रशासनाने लक्ष देऊन बंद पडलेले पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी शहरवासीयांमधून केली जात आहे.