रस्ताकामाला ३०० ब्रास मुरमाचे उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:44 IST2021-02-26T04:44:05+5:302021-02-26T04:44:05+5:30
बदनापूर : तालुक्यातील डावरगाव शिवारातील एका शेतातून ३०० ब्रास मुरमाचे अवैध उत्खनन करून वाहतूक करण्यात आली आहे. ही बाब ...

रस्ताकामाला ३०० ब्रास मुरमाचे उत्खनन
बदनापूर : तालुक्यातील डावरगाव शिवारातील एका शेतातून ३०० ब्रास मुरमाचे अवैध उत्खनन करून वाहतूक करण्यात आली आहे. ही बाब समोर येताच संबंधित शेतमालकास साडेतेरा लाख व पोकलॅनधारकास साडेसात लाख रुपयांची नोटीस बदनापूरच्या तहसीलदार छाया पवार यांनी दिली आहे.
तालुक्यातील डावरगाव शिवारात तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी जाऊन तेथील एका शेतातून विल्हाडी ते सोमठाणा रस्त्याच्या कामासाठी विनापरवाना मुरमाचे उत्खनन केल्याचा पंचनामा करण्यात आला होता. पंचनाम्याचा अहवाल आल्यानंतर बदनापूरच्या तहसीलदार पवार यांनी ३०० ब्रास गौण खनिजाचे उत्खनन केल्याबाबत संबंधित शेतमालकास अवैध गौण खनिजाची किंमत, मूळ रॉयल्टी, एकूण दंड अशी १३ लाख ४८ हजार ५०० रुपयांची नोटीस काढली आहे. नोटीस मिळाल्यापासून २४ तासांच्या आत खुलासा सादर करण्याच्या सूचना देऊन कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच याच प्रकरणात विनापरवाना मुरमाचे उत्खनन केल्याचा आरोप ठेवून एका पोकलेनधारकास साडे सात लाख रुपयांची नोटीस काढली आहे. तसेच तालुक्यातील रामखेडा, पाडळी, बदनापूर शिवारांत अवैध वाळू उत्खनन केल्याप्रकरणी तिघांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत.