Examine the immersion path by 'drone' | विसर्जन मार्गाची ‘ड्रोन’द्वारे पाहणी
विसर्जन मार्गाची ‘ड्रोन’द्वारे पाहणी

जालना : गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ड्रोन’द्वारे शहरातील श्रींच्या विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली जात आहे. ठाणेस्तरावरही हा उपक्रम राबविला जाणार असून, पाहणी अहवाल आल्यानंतर दक्षतेबाबत आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.
गणेश विसर्जन मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यंदा प्रथमच ड्रोनद्वारे विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली जात आहे. पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे ही पाहणी केली जात आहे. पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर व त्यांचे सहकाऱ्यांनी शनिवारी शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीची ड्रोनद्वारे पाहणी केली. मार्गावर झालेले अतिक्रमण, होणारी वाहतूक कोंडी, वाहतुकीचे मार्ग यासह इतर बाबींची पाहणी केली जात आहे. जालना शहरासह जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणावरील मार्गांचीही ड्रोनद्वारे पाहणी केली जात आहे. संबंधितांकडून अहवाल आल्यानंतर दक्षतेबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या जाणार आहेत.
गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलीस दलाच्यावतीने आवश्यक ती उपाययोजना केली जात आहे.

Web Title: Examine the immersion path by 'drone'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.