सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:30 IST2021-04-07T04:30:50+5:302021-04-07T04:30:50+5:30
परतूर : आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांवर अहोरात्र उपचार करणारे डॉक्टर व कर्मचारी आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र ...

सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी
परतूर : आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांवर अहोरात्र उपचार करणारे डॉक्टर व कर्मचारी आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र खोलीत राहात आहेत. एकाच घरात राहून वेगळे राहण्याची वेळ आल्याने सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी असे म्हणण्याची वेळ आली आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्यात दररोज ५०० पेक्षा अधिक रूग्ण निघत आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांना कोरोनाची भीती वाटत आहे. अशा परिस्थितही कोरोना रुग्णांवर डॉक्टर व कर्मचारी अहोरात्र उपचार करीत आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता हे डॉक्टर, कर्मचारी काम करीत आहेत. तसेच आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी ते स्वतंत्र खोलीत राहतात. एकाच घरात राहून मुला-बाळांना जवळ घेता येत नसल्याचे एका आरोग्य कर्मचाऱ्याने सांगितले. कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी स्वत: तीन ते चार दिवसाला कोरोना चाचणी करीत असल्याचे ते म्हणाले.
मुलाबाळांची काळजी वाटते पण...
कोरोना काळ सुरू झाल्यापासून आमचे कुटुंबीय चिंतेत असते. कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी आम्ही वेगळ्या रूममध्ये राहतो. नियमित मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदी बाबी कराव्या लागतात. मुलाबाळांना जवळही घेता येत नाही.
डॉ. डी. आर. नवल, वैद्यकीय अधीक्षक
चौकट.
आम्ही कोविडच्या काळात रुग्णांची काळजी घेण्याबरोबरच कुटुंबियांची चिंता सतावते. घरी गेल्यानंतर बाहेरूनच बाथरूममध्ये आंघोळ करून, प्रत्येक रूममध्ये सॅनिटायझर ठेवून काळजी घेतो. तसेच प्रत्येक वेळी कोरोना टेस्ट करतो.
डॉ. जगन्नाथ मोरे, तालुका आरोग्य अधिकारी
कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घ्यावी लागते. प्रत्येकाला स्वतंत्र खोली, सॅनिटायझर मास्क आदींचा वापर व सर्व नियम पाळूनही भीती वाटते.
स्मिता मोरे, पत्नी
कोविड सेंटरवर पीपीई कीटसह इतर साहित्याचा वापर करीत कुटुंबियांचीही काळजी घ्यावी लागते. घरी जातांना भीती वाटते. सर्व नियम पाळून प्रत्येकाला स्वंतत्र बेड व खोलीचा वापर करावा लागतो. एकाच घरात राहून वेगळे राहिल्यासारखे वाटते.
डॉ. महादेव उनउने, डॉक्टर
मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत आहे. अशावेळी ते घरी आल्यानंतर अगोदर आंघोळ, कपडे बदलणे, सॅनिटायझर आदी बाबी करतात. परंतु, तरीही धाकधूक मनात असतेच. पूर्ण कुटुंबच धोक्यात येण्याची भीती असते. मुलाबाळांची काळजी वाटते. पण कर्तव्यही महत्त्वाचे आहे.
डॉ. वर्षा नवल, कुंटुबाची प्रतिक्रिया