शिवशाही बसेसही सुसाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:35 IST2021-09-07T04:35:56+5:302021-09-07T04:35:56+5:30
गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाला कधी लॉकडाऊन तर कधी संचारबंदी लागू करावी लागली. ...

शिवशाही बसेसही सुसाट!
गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाला कधी लॉकडाऊन तर कधी संचारबंदी लागू करावी लागली. या काळात सर्व व्यवहार बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल झाले. यामुळे एसटी महामंडळाचेही मोठे नुकसान झाले. सर्व बसेस आगारात उभ्या कराव्या लागल्या. आता मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे सर्व व्यवहार सुरू झाले असून, एसटी महामंडळालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. जालना विभागात सुरू असलेल्या २०० पैकी १९४ बसेस विविध मार्गांवर धावत आहे. ५ पैकी ४ शिवशाही बसेस सुरू झाल्या आहेत. त्यालाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
बसेसचे दररोज सॅनिटायझेशन
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोरोनाची लागण होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. प्रत्येक बसेसचे दररोज सॅनिटायझेशन केले जात आहे. शिवाय, प्रवाशांना हातांना नियमित सॅनिटायझ करण्यास सांगण्यात येते. तसेच मास्कशिवाय प्रवाशांना बसमध्ये बसू दिले जात नाही.
जिल्ह्यात २०० पैकी जवळपास १९४ बसेस सुरू झाल्या आहेत. आपल्याकडे ५ शिवशाही बसेस आहे. त्यापैकी सध्या चार बसेस सुरू आहे. शिवशाही बसमधून दररोज दीड ते दोन लाखांचे उत्पन्न मिळत आहे.
प्रमोद नेहूळ, विभाग नियंत्रक
या मार्गावर सुरू आहेत शिवशाही
जालना - कुर्ला
जालना - पुणे
परतूर - पुणे
अंबड - पुणे