मालक गेल्यावरही त्यांनी संकटावर मात करून चालविला संसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:28 IST2021-03-19T04:28:49+5:302021-03-19T04:28:49+5:30
आता तुम्ही म्हणाला हा मुद्दा सांगण्याची तुम्हाला आजच का गरज वाटली. परंतु निमित्तही तसे धीर गंभीर आहे. १९ मार्च ...

मालक गेल्यावरही त्यांनी संकटावर मात करून चालविला संसार
आता तुम्ही म्हणाला हा मुद्दा सांगण्याची तुम्हाला आजच का गरज वाटली. परंतु निमित्तही तसे धीर गंभीर आहे. १९ मार्च १९८६ रोजी विदर्भात साहेबराव करपे आणि त्यांची पत्नी मालती करपे या शेतकरी दांपत्याने आत्महत्या केली होती. त्यामुळे हा शेतकरी स्मृतिदिन म्हणून जाहीर नसला तरी तो साजरा केला जातो. काहीजण या दिवशी अन्नत्याग आंदोलनही करतात. या अत्यंत गंभीर आणि तेवढ्याच आव्हात्मक विषयावर येथील संवेदनशील शिक्षिका प्रतिभा श्रीपत यांनी लिहिण्याचे धाडस केले. ‘सूर्योदय’ या कादंबरीतून श्रीपत यांनी बळीराजाच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने कधीच हिंमत न हारता त्या संकटाशी दोन हात केले. याचे वास्तव थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्यात दिवस-दिवस सोबत राहून मांडणी केली आहे.
ही मांडणी म्हणजे शेतकरी पत्नीची कर्मकहाणीच म्हणावी लागेल. श्रीपत व त्यांच्या पतीने सुटीच्या दिवशी रेवगाव, दरेगाव तसेच अन्य गावांमध्ये जाऊन ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी संसाराचा गाढा कशा हिमतीने चालवितात याचे हुबेहूब चित्रण वास्तवपणे मांडले आहे. अनेक संकटांशी सामना करून मुलांचे शिक्षण, शेतीतील कामे ही कधीही बंद पडू दिली नसल्याचे दिसून आल्याचा अनुभव श्रीपत यांनी सांगितला. त्यांनी हे सूर्योदय पुस्तक लिहिताना महिलांना सकारात्मक संदेश देऊन संकटांशी दोन हात करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची पत्नी तिच्यासह तिच्या संसारात कसा सूर्योदय आणते हे मांडले आहे.
बातम्या वाचून मन हेलावल्यानेच सूर्योदय
शिक्षिका असल्याने समाजाशी आपली नाळ जुळलेली आहे. एक महिला कर्तापुरुष गेल्यावर हतबल होते. परंतु शेतकऱ्याची पत्नी मात्र कधीच हतबल झालेली मला आढळून आली नाही. त्यामुळे इतर महिलांनाही त्यांची प्रेरणा मिळावी यातूनच सूर्योदयची निर्मिती झाली आहे. शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या वाचल्यावर आपण हेलावून जात असून, त्यातूनच ही संकल्पना सुचली. या पुस्तकाची प्रस्तावना साहित्यिक डॉ. देवकर्ण मदन आणि सहप्रस्तावना ही साहित्यिक रेखा बैजल यांनी लिहिली आहे.
प्रतिभा श्रीपत, शिक्षका, जैन मराठी विद्यालय, जालना