बहुमतानंतरही चार ग्रामपंचायती जाणार विरोधकांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:04 IST2021-02-05T08:04:32+5:302021-02-05T08:04:32+5:30
भोकरदन : ग्रामपंचायत निवडणुकीत बहुमत मिळविलेले असतानाही चार ग्रामपंचायतींचे सरपंचपद विरोधकांच्या ताब्यात जाणार आहे. आरक्षण सोडतीत सरपंचपद विरोधी गटाकडे ...

बहुमतानंतरही चार ग्रामपंचायती जाणार विरोधकांच्या ताब्यात
भोकरदन : ग्रामपंचायत निवडणुकीत बहुमत मिळविलेले असतानाही चार ग्रामपंचायतींचे सरपंचपद विरोधकांच्या ताब्यात जाणार आहे. आरक्षण सोडतीत सरपंचपद विरोधी गटाकडे गेल्याने संबंधितांना राजकीय धक्का बसल्याचे चित्र आहे.
भोकरदन तालुक्यातील सरपंचपदाच्या जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये चार ग्रामपंचतींमध्ये निवडणुकीत बहुमत मिळूनही विरोधी पॅनलचा सरपंच होणार आहे. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या पिंपळगाव सुतार या ग्रामपंयतीवर तब्बल २५ वर्षानंतर भाजपाचा सरपंच विराजमान होऊन भाजपाचा झेंडा फडकणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत बहुमत राष्ट्रवादीचे आहे. मात्र मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षण निघाले असून, ही जागा भाजपच्या शारदा मुकुंद मनोहर यांनी जिंकली आहे. त्यामुळे बहुमत मिळवूनसुध्दा या ग्रामपंचायतीमध्ये भाजपाचे सोमनाथ हराळ यांच्या समर्थकांची सरपंचपदी वर्णी लागणार आहे. अशीच परिस्थिती पिंपळगाव शेरमुलकी गावातसुध्दा झाली आहे. या ठिकाणी बहुमत राष्ट्रवादीचे आहे. मात्र आरक्षण मागासवर्गीय प्रवर्गाला सुटले आहे. ही जागा भाजपाच्या सुखदेव तांबे यांनी जिंकली आहे. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस बहुमत येऊनसुध्दा सत्तेपासून दूर राहणार आहे. तर नळणी (खु.) येथे भाजपाचे बहुमत आहे. मात्र मागासवर्गीय आरक्षणाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतीक्षा विलास सरोदे यांनी जिंकली आहे. वाडी (बु.) येथेसुद्धा ओबीसीच्या दोन्ही जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीचा सरपंच होणार आहे.
नवख्या उमेदवारांना मतदारांचे प्राधान्य
ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी अनेक मातब्बरांना धूळ चारली असून, नवख्यांना संधी दिली आहे. त्यामध्ये बरंजळा साबळे, सिरजगाव मंडम या गावात मातब्बराची धोबीपछाड झाली. तर आमदार संतोष दानवे यांच्या केदारखेडा व माळेगाव येथील तर माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या सास-यांच्या हिसोडा व आव्हाना येथील जवळच्या नातेवाइकांच्या पॅनलचा पराभव झाला आहे.