कोरोना लसीकरणासाठी आठ केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:19 IST2021-01-13T05:19:08+5:302021-01-13T05:19:08+5:30
विजय मुंडे जालना : केंद्र शासनाने १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर आणि ...

कोरोना लसीकरणासाठी आठ केंद्रे
विजय मुंडे
जालना : केंद्र शासनाने १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर आणि वरिष्ठस्तरावरील सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने लसीकरणाची पूर्वतयारी केली आहे. जिल्ह्यातील आठ केंद्रांवर आरोग्य विभागातील १२ हजार ५०० वर अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. शासनाकडून प्राप्त होणाऱ्या लसीचा साठा शहरातील मुख्य स्टोअर रूम ते प्राथमिक आरोग्य केंद्र अशा ५४ ठिकाणी केला जाणार आहे.
जिल्ह्यात १२ मार्च रोजी पहिला कोरोना संशयित आढळून आला होता. तर ६ एप्रिल रोजी पहिला कोरोना रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर सुरू झालेला कोरोनाचा कहर वाढत गेला आणि जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १३ हजार ३५९ वर गेली. गत काही महिन्यांपासून रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण घटले आहे. कोरोना लसीकरणाच्या दृष्टीने राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी जिल्ह्यात तयारी केली आहे. त्या दृष्टीने दोन वेळेस लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली असून, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील आठ केंद्रावर लसीकरण होणार असून, शासनाकडून प्राप्त होणाऱ्या लसीची जिल्ह्यातील ५४ ठिकाणी साठवणूक केली जाणार आहे. त्यात जिल्ह्यातील प्रमुख स्टोअरसह तालुकास्तरावरील रुग्णालये, ४१ प्राथमिक आरोग्य केंद्रातही ही लस पुरविली जाणार आहे. जिल्ह्यातील १२ हजार ५०० वर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोविन ॲपवर लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे.
प्रत्येक केंद्रावर ११ जणांची टीम
पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील आठ केंद्रावर कोरोना लसीकरण केले जाणार आहे. जालना येथील जिल्हा रुग्णालय, भोकरदन, मंठा, परतूर, घनसावंगी, अंबड येथील रुग्णालय तसेच शेलगाव व खासगाव या आरोग्य केंद्रात लसीकरण होणार आहे. प्रत्येक केंद्रावर पाच लसीकरण अधिकारी, इतर पाच कर्मचारी व एक नोडल अधिकारी असे एकूण ११ जण कार्यरत राहणार आहेत. शिवाय आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी लसीकरणावर लक्ष ठेवणार आहेत.
१० लाख चाचण्या
जिल्ह्यात आजवर तब्बल १० लाख ३७२५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात ७१ हजार ३१८ आरटीपीसीआर व ३२ हजार ४०७ अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ११ हजार ५६ तर अँटिजेन चाचण्यांमध्ये २३०३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
रिकव्हरी रेट ९६.०३ वर
जिल्ह्यातील कोरोना रिकव्हरी रेट ९६.०३ वर असून, आजवर १२ हजार ८२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्याचा मृत्यूदर २.६५ असून, कोरोनामुळे आजवर ३५४ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना लसीकरणाबाबत जिल्हा यंत्रणेने पूर्ण तयारी केली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले असून, दोन वेळेस रंगीत तालीमही घेण्यात आली आहे. शासनस्तरावरून अद्याप कोणतेही आदेश आम्हाला प्राप्त झाले नाहीत. शासनस्तरावरून येणारे आदेश आणि सूचनेनुसार लसीकरणाची मोहीम राबविली जाणार आहे.
डॉ. विवेक खतगावकर
जिल्हा आरोग्य अधिकारी, जालना
जिल्ह्यातील कोरोना स्थिती
संशयित - १९५२५
एकूण बाधित- १३३५९
आजवर मृत्यू-३५४
कोरोनामुक्त - १२८२९