खाद्यतेलांच्या दरात भडका उडण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:46 IST2021-02-23T04:46:43+5:302021-02-23T04:46:43+5:30
इंधन दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च पाच ते दहा टक्क्यांनी वाढल्याने, सर्वच वस्तुमालांच्या दरात तेजी येण्याची शक्यता आहे. त्यातच कोरोनाने पुन्हा ...

खाद्यतेलांच्या दरात भडका उडण्याची शक्यता
इंधन दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च पाच ते दहा टक्क्यांनी वाढल्याने, सर्वच वस्तुमालांच्या दरात तेजी येण्याची शक्यता आहे. त्यातच कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांची धावपळ वाढली आहे. सध्या तरी बहुतांश वस्तुमालांचे दर स्थिर आहेत.
शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी खाद्यतेलाची आयात थांबविण्याची आवश्यक असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे खाद्यतेल सोमवारी (२२ फेब्रुवारी) महागण्याची दाट शक्यता आहे. सरकारने खाद्यतेल उत्पादक कंपन्यांना करामध्ये मोठी सूट दिली असून, तीळ आणि ताडाच्या तेलाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. खाद्यतेलाच्या आयातीवर ६५,०००ते ७५,००० कोटी रुपये खर्च होत आहेत. त्यामुळे आयात थांबवून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावेत, अशी सरकारची इच्छा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. यामुळेच खाद्यतेलाच्या दरात सोमवारी मोठी तेजी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या २०० रुपयांची तेजी आहे. पामतेल १२,०००, सोयाबीन तेल १२,२००, सरकी तेल १२,१००, सुर्यफूल तेल १४,६००, शेंगदाना तेल १५,००० आणि करडी तेलाचे दर १७,००० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
तेलाच्या दरांतील तेजी पाहता, सोयाबीनमध्येही मोठी तेजी येण्याची शक्यता आहे. मोठी मागणी आणि कमी उत्पादन होत असल्याने आगामी तीन वर्षांपर्यंत सोयाबीनच्या दरात तेजी कायम राहील, असे जाणकारांचे मत आहे. सोयाबीनची आवक दररोज ३०० पोते इतकी असून, भाव ४,७०० ते ४,८०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
गव्हाची आवक दररोज ५०० पोते इतकी असून, दर १,६०० ते २,३०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. ज्वारीची आवक दररोज ५०० पोते इतकी असून, भाव १,४०० ते ३,३०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. बाजरीची आवक दररोज १०० पोते इतकी असून, भाव १,१३० ते १,३०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. मक्याची आवक दररोज ५०० पोते इतकी असून, भाव १०५० ते १२५० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. तुरीची आवक दररोज २ हजार पोती इतकी असून, भाव ६,५०० ते ७,००० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. हरभऱ्याची आवक दररोज १ हजार पोती इतकी असून, भाव ४,४०० ते ४,७०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
गुळाची आवक दररोज ४ हजार भेली इतकी असून, भाव २,७०० ते ३,२०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. साखरेचे दर ३,२५० ते ३,४०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. साबुदाणा ४,५०० ते ५,०००, शेंगदाणा ८,५०० ते १०,२००, हरभरा डाळ ५,५०० ते ५,८००, तूरडाळ ९,००० ते १०,०००, मूगडाळ ९,००० ते ९,७००, मसूर डाळ ६,५०० ते ६,८०० आणि उडीद डाळीचे दर ९,००० ते १०,२०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
बाजारातील सर्व वस्तुमालांची तेजीकडे घोडदौड सुरू असताना, सोने मात्र ३ हजार रुपयांनी घसरले. सध्या सोन्याचे दर ४८,२०० रुपये प्रति तोळा असे आहेत. चांदीचे दर स्थिर म्हणजे ६९,००० रुपये प्रति किलो असे आहेत.