नियोजित प्रयत्नांमुळे वडीगोद्री कोरोनामुक्त, तीन महिन्यांपासून गावात एकही रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:31 IST2021-08-26T04:31:53+5:302021-08-26T04:31:53+5:30

राजू छल्लारे वडीगोद्री : प्रशासनाच्या मदतीने ग्रामपंचायतीने राबविलेल्या उपाययोजना आणि ग्रामस्थांनी केलेल्या सूचनांचे पालन यामुळे वडीगोद्री गावातून कोरोना हद्दपार ...

Due to planned efforts, Wadigodri is coron-free, with no patient in the village for three months | नियोजित प्रयत्नांमुळे वडीगोद्री कोरोनामुक्त, तीन महिन्यांपासून गावात एकही रुग्ण नाही

नियोजित प्रयत्नांमुळे वडीगोद्री कोरोनामुक्त, तीन महिन्यांपासून गावात एकही रुग्ण नाही

राजू छल्लारे

वडीगोद्री : प्रशासनाच्या मदतीने ग्रामपंचायतीने राबविलेल्या उपाययोजना आणि ग्रामस्थांनी केलेल्या सूचनांचे पालन यामुळे वडीगोद्री गावातून कोरोना हद्दपार झाला आहे. विशेष म्हणजे मागील तीन महिन्यांपासून गावात एकही रूग्ण आढळलेला नाही.

धुळे - सोलापूर व जालना - बीड महामार्गावर ४३०९ लोकसंख्येचे वडीगोद्री हे गाव वसलेले आहे. गत दीड - दोन वर्षात गावातील १०८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, आजवर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. गावात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सभापती बापूराव खटके, सरपंच रत्नप्रभा पंढरीनाथ खटके यांनी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना केल्या. ग्रामस्थांनी सूचनांचे पालन केले. त्यामुळे गाव कोरोनामुक्त बनले आहे. गावात ९० टक्के लसीकरण केले आहे. गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी आजही इतर उपाययोजना केल्या जात आहेत.

लसीकरणासाठी समिती

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. तपासणी, चाचणी, उपचारावर भर दिला.

ग्रामस्थांनीही सूचनांचे पालन केल्याने गाव कोरोनामुक्त बनल्याचे पं. स. सभापती बापूराव खटके म्हणाले.

ग्रामपंचायतीने असे केले प्रयत्न...

गावातील सर्व नागरिकांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. बाहेरून येणाऱ्या नागरिकांचे अलगीकरण, तपासणी करण्यात आली.

सॅनिटायझर फवारणी, स्वच्छतेवर भर देण्यात आला. शिवाय गावातील नागरिकांचे आजवर ९० टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

पालकमंत्री राजेश टोपे यांनी केलेले मार्गदर्शन, प्रशासनाची साथ आणि सर्वपक्षीयांना सोबत घेऊन केलेले काम यामुळे गाव कोरोनामुक्त बनले आहे. यापुढेही गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये व ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठीही ग्रामपंचायतीचे प्रयत्न सुरू आहेत.

- रत्नप्रभा खटके, सरपंच

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आणि गावातील सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्या सहकार्यातून गावात उपाययोजना राबविण्यात आल्या. स्वच्छता, लसीकरणासह इतर उपाययोजना करण्यावरही भर देण्यात आला आहे.

- नंदकुमार गाडगे, ग्रामसेवक

बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन अलगीकरण करण्यात आले. गरजेनुसार संबंधितांवर उपचार करण्यात आले. शिवाय विविध पथकांमार्फत आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले आहे. लसीकरण वेळेत पूर्ण व्हावे, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

- डॉ. सुशील जावळे

Web Title: Due to planned efforts, Wadigodri is coron-free, with no patient in the village for three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.