दरवाढीमुळे रिक्षाचालकांना संसाराचा गाडा चालविण्यासाठी करावी लागतेय कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:32 IST2021-02-24T04:32:03+5:302021-02-24T04:32:03+5:30
जालना : मागील काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत ...

दरवाढीमुळे रिक्षाचालकांना संसाराचा गाडा चालविण्यासाठी करावी लागतेय कसरत
जालना : मागील काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. रिक्षाचालकांना संसाराचा गाडा चालविताना मोेठी कसरत करावी लागत असून, बहुतांश रिक्षाचालक पर्यायी नोकरीचा शोध घेत आहे.
जालना जिल्ह्यात ७२५२ ऑटोरिक्षा आहेत. दिवसभर रिक्षा चालवून त्यातून आलेल्या पैशांतून रिक्षाचालक आपल्या संसाराचा गाडा चालवित असतात. ऐवढ्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत नसल्याने त्यांना मोठी कसरत करावी लागते. त्यातच मागील काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचे भाव दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दिवसभर रिक्षा चालवून मिळालेले निम्मे पैसे हे पेट्रोलमध्येच जात असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. त्यामुळे बहुतांश रिक्षाचालक मिळालेल्या वेळेत पर्यायी काम करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पेट्रोल-डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका हा रिक्षाचालकांना बसला असून, त्यांना रिक्षा चालविणेही अवघड झाले आहे. शासनाने तत्काळ पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावे, अशी मागणी होत आहे.
दिवसभरामध्ये अगोदर १०० ते १५० रुपयांचे पेट्रोल टाकावे लागत असे. आता २०० ते ३०० रुपयांचे पेट्रोल टाकावे लागते. दोन ते तीन लिटर पेट्रोल आता सध्या लागते. कुटुंबाचा खर्च भागविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शेती नसल्यामुळे यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. दर दिवसाला एक लिटरमागे पूर्वी २०० रुपये मिळायचे. आता १५० रुपये मिळतात. शासनाने पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावे.
राजेंद्र संसारे, रिक्षाचालक, अंबड
भोकरदनसारख्या शहरात दिवसभराचा व्यवसाय ३०० रुपये होतो. त्यामध्ये दीड ते दोन लिटर पेट्रोल लागते. त्यामुळे दिवसाकाठी कसेबसे १५० ते २०० रुपये उरतात. कुटुंबातील पाच जणांचा उदरनिर्वाह यावर भागत नाही. त्यामुळे फावल्या वेळेत दुकानात हमाली करून मिळालेल्या पैशातून संसार चालवावा लागत आहे. शासनाने पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावे.
शेख अन्वर, रिक्षाचालक, भोकरदन
माझे चार जणांचे कुटुंब आहे. सर्वांचा उदरनिर्वाह हा रिक्षावर अवलंबून आहे. मात्र पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे संसाराचा गाडा चालविताना दमछाक होत आहे. २०० रुपये पेट्रोलमध्ये जातात. १५० ते २०० आम्हाला उरतात. त्यामध्ये घर भाडे, किराणा खर्च व मुलांचा दवाखाना करावा लागतो. त्यामुळे काहीच शिल्लक राहत नाही. त्यामध्ये संसार कसा चालवावा? असा प्रश्न निर्माण होत आहे. रिक्षाचालकांना पेन्शन सुरू करावे.
अजिमखान लतिफखान, रिक्षाचालक, भोकरदन