खराब रस्त्यामुळे महिलेची रस्त्यातच प्रसूती; घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी-बानेगाव रस्त्यावरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 10:54 IST2018-02-05T00:17:31+5:302018-02-05T10:54:50+5:30
खड्डेमय रस्त्यामुळे रुग्णालयात जाण्यास झालेला विलंब व धक्के बसल्याने एका महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली. घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी-बानेगाव रस्त्यावर रविवारी सकाळी हा प्रकार घडला.

खराब रस्त्यामुळे महिलेची रस्त्यातच प्रसूती; घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी-बानेगाव रस्त्यावरील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
तीर्थपुरी : खड्डेमय रस्त्यामुळे रुग्णालयात जाण्यास झालेला विलंब व धक्के बसल्याने एका महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली. घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी-बानेगाव रस्त्यावर रविवारी सकाळी हा प्रकार घडला. यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.
तीर्थपुरी ते बानेगाव या १५ किलोमीटर रस्त्याची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहनातून ये-जा करणा-यांना धक्के बसत असून, अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याचा प्रत्यय रविवारी बानेगाव येथील एका कुटुंबाला आला. सुजाता चंद्रकांत पानखडे यांना पहाटे प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यामुळे नातेवाइक त्यांना तीर्थपुरी येथील रुग्णालयात नेण्यासाठी जीपचे नियोजन केले.
सुजाता यांची नाजूक स्थिती व खराब रस्ता या स्थितीत जीप तीर्थपुरीकडे निघाली. खड्डेमय रस्त्यामुळे धक्के बसल्याने सुजाता यांच्या वेदना वाढल्या. सात किलोमीटर पुढे आल्यानंतर सकाळी सात वाजता त्यांची रस्त्यातच प्रसूती झाली. त्यांनी एका मुलास जन्म दिला.
अर्धा तासानंतर त्यांना तीर्थपुरी येथील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. खड्डेयम रस्त्यामुळे बाळाला श्वासोच्छवासास त्रास झाल्याने दोन तास कृत्रिमरीत्या आॅक्सिजन देण्यात आला.
रुग्णालयात येण्यास आणखी काही वेळ उशीर झाला असता, तर बाळ दगावले असते, अशी शक्यता डॉ. सीमा उढाण यांनी व्यक्त केली.