जिल्ह्यातील १९ गावांमध्ये पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:21 IST2021-07-15T04:21:47+5:302021-07-15T04:21:47+5:30
अस्वच्छ पाणी पिल्यामुळे ग्रामस्थांना गॅस्ट्रोसह इतर विविध आजार होण्याची भीती असते. या आजारांचा फैलाव होऊ नये, यासाठी ग्रामीण, शहरी ...

जिल्ह्यातील १९ गावांमध्ये पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण!
अस्वच्छ पाणी पिल्यामुळे ग्रामस्थांना गॅस्ट्रोसह इतर विविध आजार होण्याची भीती असते. या आजारांचा फैलाव होऊ नये, यासाठी ग्रामीण, शहरी भागातील जलस्रोतांमधील पाणी नमुन्यांची जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून नियमित तपासणी केली जाते. पाणी नमुन्यांची तपासणी केल्यानंतर ज्या गावातील जलस्रोतांचे पाणी नमुने दूषित आढळून येतात, त्यांना अहवाल देऊन पाणी स्वच्छतेबाबत सूचना केली जाते. वेळोवेळी सूचना देऊनही ज्या ग्रामपंचायती पाणी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात, अशांवर जिल्हा परिषद प्रशासन कारवाईचा बडगा उगारू शकते. त्यात सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यात अस्वच्छ पाणी पिल्यानंतर आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे.
शहरी भागात एका ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य
ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील पाणी नमुने तपासणीची संख्या कमी आहे. त्यामुळे दूषित पाण्याचा अहवाल कमी येतो.
त्यात गत महिन्यात घनसावंगी, जाफराबाद, मंठा, नेर आदी रुग्णालयांतर्गत पाणी नमुने तपासणीसाठी आले नसल्याचे अहवालात दिसत आहे.
ज्या गावांत तपासणीच झाली नाही, त्यांचे काय?
जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून नियमित शहरी, ग्रामीण भागातील पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते. पाणी नमुने संकलित करण्याचे काम आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचारी करीत असतात.
नियमित पाणी नमुने देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींचीही आहे. नियमित पाणी नमुने तपासणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो.
ज्या गावांमध्ये पाणी नमुन्यांची तपासणी केली जात नाही, अशा गावांकडे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने विशेष लक्ष देण्याचीही गरज निर्माण झाली आहे.
आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या!
अस्वच्छ पाणी पिण्यात आल्यानंतर नागरिकांसह बालकांना विविध आजाराची लागण होण्याची शक्यता अधिक असते.
अनेक वेळा पाइपलाइन खराब असल्याने अस्वच्छ पाणी पाइपलाइनमध्ये जाते. तेच पाणी नळाद्वारे येऊ शकते. त्यामुळे पाणी उकळून पिणे गरजेचे आहे.
पाणी उकळण्यासह त्याचे नर्जंतुकीकरण व्हावे, यासाठी औषध दुकानांमध्ये औषधेही उपलब्ध आहेत. याचाही वापर पाण्याच्या स्वच्छतेसाठी केला जातो.
कोरोनामुळे नमुने घटले
कोरोनाच्या प्रादुर्भावापूर्वी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत महिन्याकाठी एक हजारावर पाणी नमुन्यांची तपासणी केली जात होती. तपासणी अहवाल संबंधित ग्रामपंचायत व प्रशासकीय विभागांना देऊन पाणी स्वच्छतेबाबत सूचित केले जात होते; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि पाणी नमुने घेणाऱ्या आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचाऱ्यांवर इतर कामकाज वाढले. त्याशिवाय इतर आजारांचे नमुने घेण्याचीही जबाबदारी याच कर्मचाऱ्यांवर आहे. ही बाब पाहता पाणी नमुने तपासणीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे.