विश्वासघातकी लोकांसोबत काम करायचे नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:33 IST2021-09-05T04:33:54+5:302021-09-05T04:33:54+5:30
जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मते मागितली आणि ५६ वर मुख्यमंत्री झाले. ५४ वर उपमुख्यमंत्री झाले आणि ...

विश्वासघातकी लोकांसोबत काम करायचे नाही
जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मते मागितली आणि ५६ वर मुख्यमंत्री झाले. ५४ वर उपमुख्यमंत्री झाले आणि ४४ वर महसूलमंत्री झाले. अशा विश्वासघातकी लोकांसोबत भाजप आता काम करणार नाही. जे पक्ष प्रामाणिकपणे सोबत राहतील त्यांना घेऊन आगामी निवडणुका लढणार आणि जिंकणार असल्याचा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जालना येथे व्यक्त केला.
भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी शनिवारी जालना येथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, भाजप पक्ष स्वबळावर मजबूत झाला आहे. ज्यांनी निवडणुकीत मोदींच्या नावे मते मागितली त्यांनी विश्वासघात केला. त्यामुळे आगामी काळात जे पक्ष प्रामाणिकपणे सोबत राहतील त्यांना सोबत घेऊन नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणूक लढणार आणि जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजप पदाधिकाऱ्यांचे काम चांगले सुरू आहे. नगरसेवकांनी जनतेची कामे करावीत. केलेल्या कामांचा हिशोब जनतेला द्यावा. कामांचा अहवाल जनतेसमोर सादर करावा, असे सांगत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले. या वेळी माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर, आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष संतोष दानवे, राहुल लोणीकर, भास्कर दानवे, राजेश राऊत, सिद्धिविनायक मुळे, सतीश जाधव, बाबासाहेब कोलते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.