जालना : मराठा समाजाच्या आरक्षणावरून कोणीही राजकारण करू नये, यात समाजाचे हित कसे होईल, हे पाहण्याकडे अधिकचे लक्ष देण्याची गरज असल्याचे वक्तव्य ज्येष्ठ नेते खा. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले.
खा. भोसले हे मंगळवारी जालना येथे आले होते. त्यांनी मोजक्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण नाकारले आहे. असे असले तरी हा लढा येथे संपलेला नाही. त्यासाठी सर्व समाजबांधव, राजकीय पक्षांनी एकत्रित येण्याची गरज आहे. श्रेयवादाची ही लढाई नसून, समाजातील युवक-युवतींना या आरक्षणाचा लाभ झाला पाहिजे. राज्य सरकारने यात हस्तक्षेप करून सारथी संस्था मजबूत करणे, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षिणक सवलती देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी अशोक पडूळ, सुनील आर्दड, नगरसेवक विष्णू पाचफुले, सुभाष कोळकर, राजेंद्र गोरे, सतीश देशमुख, संतोष कऱ्हाळे, यांच्यासह मराठा समाजातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.