लस घेण्यापूर्वी करा रक्तदान; नंतर दोन महिने थांबावे लागणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:29 IST2021-03-18T04:29:33+5:302021-03-18T04:29:33+5:30
जालना : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आता लसीकरणाची मोहीम जोमात सुरू आहे. परंतु, कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला, दुसरा डोस घेतल्यानंतर २८ ...

लस घेण्यापूर्वी करा रक्तदान; नंतर दोन महिने थांबावे लागणार !
जालना : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आता लसीकरणाची मोहीम जोमात सुरू आहे. परंतु, कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला, दुसरा डोस घेतल्यानंतर २८ दिवस रक्तदान करता येणार नाही. ही बाब पाहता रक्तदात्यांनी लस घेण्यापूर्वीच रक्तदान करणे गरजेचे आहे.
जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीसह जिल्ह्यातील चारही रक्तपेढींतून महिन्याकाठी सरासरी दीड हजार बॅग शस्त्रक्रियांसह इतर रुग्णांसाठी नेल्या जातात. जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा हा नेहमीचाच असतो. असे असले तरी शासकीय, खाजगी रुग्णालयातील रक्तपेढ्यांमधील कर्मचारी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्त संकलित करतात. तर, काही रक्तदाते स्वत: रक्तपेढीत जाऊन रक्तदान करतात. परंतु, सध्या कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला, दुसरा डोस घेतल्यानंतर रक्तदात्याला २८ दिवस रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे लसीकरणाच्या मोहिमेत रक्ताचा तुटवडा पडू नये, यासाठी संबंधित रक्तपेढीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जनजागृती करून रक्तसंकलनावर भर देणे गरजेचे आहे. यासाठी जनजागृती मोहीम राबवून रक्तदान शिबिरांचे आयोजन होणे महत्त्वाचे आहे.
ब्लड बँक प्रमुख म्हणतात...
जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीतून महिन्याकाठी जवळपास २०० बॅगची मागणी असते. त्यानुसार आम्ही शिबिरे घेऊन नियोजन करतो. कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर २८ दिवस रक्तदान करता येणार नाही. याबाबत रक्तदात्यांची जनजागृती केली जात असून, रक्तसंकलनही केले जात आहे.
-अरुण धोत्रे, जिल्हा रुग्णालय
कोरोनाकाळात रक्ताची मागणी वाढली आहे. त्यानुसार, आम्ही नियोजन करून रक्तबॅगा संकलित करतो. आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार लसीकरणानंतर दात्यांना २८ दिवस रक्तदान करता येणार नाही. त्यानुसार, आमच्याकडे रक्तदान करणाऱ्यांची जनजागृती करून रक्तसंकलित केले जात आहे.
-शिवराज जाधव, जनकल्याण रक्तपेढी, जालना
कोरोना लसीकरणाआधी मी
केले रक्तदान; तुम्हीही करा...!
मी वयाच्या १९ व्या वर्षापासून रक्तदान करीत आहे. वर्षातून तीन ते चार वेळेस रक्तदान करतो. मी कोरोना प्रतिबंधक लस घेणार आहे. लस घेतल्यानंतर २८ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे मी रक्तदान केले आहे. रक्तदात्यांनीही लस घेण्यापूर्वी रक्तदान करावे.
-दत्तात्रेय शहाणे, जालना
दुसऱ्या डोसनंतर
२८ दिवसांनी
करा रक्तदान
कोरोनाकाळात रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे रक्तदातेही रक्तदान उत्स्फूर्तपणे करीत आहेत. असे असले तरी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येणार आहे. त्यामुळे कोरोन प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी जिल्ह्यातील रक्तदात्यांनी रक्तदान करण्याची गरज आहे.
अशी आहे आकडेवारी
२५०० जणांना दैनंदिन दिली जाते कोरोना प्रतिबंधक लस
३५८३२ जणांनी घेतला लसीकरणाचा पहिला डोस
जिल्ह्यातील एकूण ब्लड बँका ४