दिंडी मार्गात राजकारण नको; वारक-यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:00 IST2018-02-04T00:00:46+5:302018-02-04T00:00:51+5:30
शेगाव ते पंढरपूर या दिंडी मार्गाला शेतकरी संघटनेचा विरोध नाही. मात्र, रस्त्यासाठी ज्या शेतक-यांच्या जमीन संपादित होणार आहेत, त्यांना योग्य मोबदला मिळावा; अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी परतूर येथे आयोजित मेळाव्यात व्यक्त केली. तर हजारो भाविकांच्या श्रद्धेच्या विषय असणा-या या मार्गात राजकारण करू नये, असे निवेदन वारक-यांनी खा. शेट्टी यांना वाटूर येथे दिले.

दिंडी मार्गात राजकारण नको; वारक-यांची मागणी
जालना/परतूर : शेगाव ते पंढरपूर या दिंडी मार्गाला शेतकरी संघटनेचा विरोध नाही. मात्र, रस्त्यासाठी ज्या शेतक-यांच्या जमीन संपादित होणार आहेत, त्यांना योग्य मोबदला मिळावा; अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी परतूर येथे आयोजित मेळाव्यात व्यक्त केली. तर हजारो भाविकांच्या श्रद्धेच्या विषय असणा-या या मार्गात राजकारण करू नये, असे निवेदन वारक-यांनी खा. शेट्टी यांना वाटूर येथे दिले.
शनिवारी परतूर येथे सभेनिमित्त आलेल्या खा. शेट्टी यांची वाटूर फाटा येथे वारक-यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. दिंडी मार्गात विनाकारण राजकारण आणले जात आहे. स्वत: ची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी मूठभर लोक दिंडीमार्ग रोखण्याचे काम करीत आहेत.
वाटूर, परतूर, आष्टी, लोणी, माजलगाव हा रस्ता १९७२ मध्ये बनला होता. त्यामुळे हा रस्ता नव्याने होणे वारक-यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. पन्नास वर्षांपूर्वी झालेल्या रस्त्याचा मोबदला आता देता येत नसेल तर अशा शेतक-यांनी कोर्टात जाऊन आपली बाजू मांडावी, परंतु शेगाव- पंढरपूर हा दिंडी मार्गात अडथळा निर्माण करू नये असे निवेदनात म्हटले आहे.
परतूर येथे आयोजित मेळाव्यातही खा. शेट्टी यांनी दिंडी मार्गाबाबत भूमिका स्पष्ट केली.
या वेळी ह.भ.प. रामकिशन नानवटे, भरत खोसे , रामराव ढवळे, बबन, पांडुरंग महाराज, बंडू धुपा पवार, साळिकराम नानवटे, प्रेमसिंग महाराज, ज्ञानेश्वर सोळंके, कारभारी सातपुते, रामदास सुरनर, बालचंद्र बच्छिरे, दगडोबा चांदणे, अशोक दाभाडे, रमेश वायाळ, दिनकर काकडे, मच्छिंद्र राऊत, दत्ता महाराज कुटनीकर, भास्कर टकले, ओमप्रकाश जाधव, यांच्यासह वारक-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.