विभागीय शिक्षक कथाकथन स्पर्धेचा निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:21 IST2021-01-01T04:21:25+5:302021-01-01T04:21:25+5:30
जालना : साने गुरुजींच्या जयंती दिनानिमित्त अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलस (ता. मंठा) च्या वतीने शिक्षकांसाठी ...

विभागीय शिक्षक कथाकथन स्पर्धेचा निकाल जाहीर
जालना : साने गुरुजींच्या जयंती दिनानिमित्त अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलस (ता. मंठा) च्या वतीने शिक्षकांसाठी आयोजित मराठवाडास्तरीय विभागीय कथाकथन स्पर्धेत सीमा बिराजदार यांनी प्रथम, शिरीष देशमुख द्वितीय, सुलभा मुंडे व अंबादास इंगोले यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती मुख्य संयोजिका कल्पना दत्तात्रय हेलसकर यांनी गुरुवारी दिली आहे.
मराठवाडा विभागीय शिक्षक कथाकथन स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी सहसंयोजक प्रा.डॉ.सुहास सदाव्रते, बाबासाहेब हेलसकर, विजय वायाळ, सतीश कुलकर्णी, प्रमोद देशमुख, मंताजी ढाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. दत्तात्रय हेलसकर यांनी १९९४ मध्ये स्थापन केलेल्या अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या हेलस (ता.मंठा) शाखेच्या वतीने कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत यंदा स्पर्धा आॅनलाईन घेण्यात आली. महादेव आगजाळ, कीर्ती राऊत, पी.एस.देशमुख यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सुनील साबळे, आर.आर.जोशी, राम तत्तापुरे, डॉ. व्यंकटेश चौधरी, वाय.जी. बेंबडे, दिलीप श्रुंगारपुतळे, जी.सी. नेरे, संगिता देशमुख यांच्यासह कथामाला कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.
हे ठरले विजेते
सीमा बिराजदार (प्रथम), शिरीष देशमुख (व्दितीय), सुलभा मुंडे व अंबादास इंगोले तृतीय तर अतुल पाटील, गीतांजली कांबळे यांनी चौथा क्रमांक पटकावला. विजेत्यांना अनुक्रमे रोख पारितोषिक रुपये दोन हजार, दीड हजार, एक हजार व पाचशे रुपये तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असे संयोजकांनी कळविले आहे.