जि. प.च्या उपाध्यक्षांनी रुग्णवाहिकाच पळवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:21 IST2021-06-11T04:21:06+5:302021-06-11T04:21:06+5:30
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळालेली रुग्णवाहिका राजकीय दबावतंत्र वापरून जिल्हा परिषदेचे ...

जि. प.च्या उपाध्यक्षांनी रुग्णवाहिकाच पळवली
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळालेली रुग्णवाहिका राजकीय दबावतंत्र वापरून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेंद्र पवार यांनी तीर्थपुरी आरोग्य केंद्राला दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सदर रुग्णवाहिका देण्याची मागणी करण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्चच्या अर्थसंकल्पीय भाषणात जुन्या रुग्णवाहिका बदलून ५०० नव्या रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जालना जिल्ह्यासाठी २० रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. त्यापैकी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १०, तर ग्रामीण, उपजिल्हा, जिल्हा, स्त्री रुग्णालयाला पाच रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. राजाटाकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालाही रुग्णवाहिका मिळणार होती. प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका घेऊन जाण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या होत्या. मात्र, राजकीय दबावतंत्र वापरून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेंद्र पवार यांनी येथील रुग्णवाहिका तीर्थपुरी येथे नेली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आमच्या हक्काची रुग्णवाहिका देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. राजाटाकळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दोन उपकेंद्र असून, ११ गावातील १८ हजार नागरिकांना या केंद्रातून आरोग्याची सेवा दिली जाते. सद्यस्थितीत असलेली रुग्णवाहिका ही पूर्णपणे नादुरुस्त असून, त्यामध्ये कुठल्याही सुविधा उपलब्ध नाहीत.
लक्ष देण्याची मागणी
जालना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेंद्र पवार यांनी राजकीय दबाव तंत्र वापरून राजाटाकळी आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका पळविली आहे, तातडीने सदरील रुग्णवाहिका देण्यात यावी, अशी मागणी माजी आरोग्य व शिक्षण सभापती रघुनाथ तौर, गणेश आर्दड, सरपंच डिगाबर आर्दड, बापूसाहेब आर्दड, विष्णू आर्दड, उद्धव आर्दड यांनी केली आहे.
राजाटाकळी येथील आरोग्य केंद्रात रुग्ण येत नाही. तेथील रस्त्यांची कामे झाले नाही. त्यामुळे आम्ही काही दिवसांसाठी येथे आलेली नवीन रुग्णवाहिका तीर्थपुरी आरोग्य केंद्राला दिली आहे. लवकरच ती रुग्णवाहिका राजाटाकळी आरोग्य केंद्राला दिली जाईल.
महेंद्र पवार, उपाध्यक्ष, जि. प. जालना