विस्कळीत इंटरनेट सेवेमुळे दस्त नोंदणीचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:26 IST2020-12-23T04:26:36+5:302020-12-23T04:26:36+5:30
(फोटो) देऊळगाव राजा : येथील दुय्यम निबंधक श्रेणी क्रमांक एक कार्यालयातील इंटरनेट सेवा सतत विस्कळीत होत आहे. विस्कळीत सेवेमुळे ...

विस्कळीत इंटरनेट सेवेमुळे दस्त नोंदणीचा बोजवारा
(फोटो)
देऊळगाव राजा : येथील दुय्यम निबंधक श्रेणी क्रमांक एक कार्यालयातील इंटरनेट सेवा सतत विस्कळीत होत आहे. विस्कळीत सेवेमुळे येथे खरेदी- विक्रीच्या दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या शेतकरी, नागरिकांना अनेक तास इंटरनेट सेवा सुरळीत होण्याची वाट पाहत थांबावे लागत आहे. विस्कळीत इंटरनेट सेवेचा इतर शासकीय कार्यालयाच्या कामकाजावरही परिणाम होत आहे.
देऊळगाव राजा येथील दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयात जमिनीच्या खरेदीखत व नोंदणीसाठी दररोज शहरासह ग्रामीण भागातील शेतकरी व खरेदीदार नागरिक येतात. दुय्यम निबंधक कार्यालयाचा कारभार ऑनलाईन चालतो. त्यामुळे इंटरनेट शिवाय कामे मार्गी लागत नाहीत. या कार्यालयासह शहरातील राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवहार बीएसएनएल ब्रॉडबँड सुविधेवर अवलंबून आहेत. मात्र बीएसएनएलची ब्रॉडबँड सुविधा वारंवार कोलमडत आहे. ही सेवा सतत विस्कळीत होत असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयासह बँका व इतर शासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. अनेक शेतकरी, नागरिक हे ४० ते ५० किलोमीटर दूर अंतरावरून या कार्यालयात खरेदी- विक्रीच्या नोंदीसाठी येतात. इंटरनेट नसल्याने दिवसभर कार्यालयात थांबून रहावे लागते. इंटरनेट सुरू झाले नाही तर परत गावी जाऊन दुसऱ्या दिवशी यावे लागते. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जात असून, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शिवाय होणारा मानसिक त्रास हा वेगळाच आहे.
समृध्दी महामार्गाच्या खोदकामासह इतर कामांसाठी केलेल्या खोदकामामुळे बीएसएनएलच्या वायरिंग तुटलेल्या आहेत. त्यामुळे तेथे सतत अडचणी निर्माण होत आहेत. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना कधी कधी दोन ते तीन दिवसही लागतात. या कालावधीत नागरिकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन पर्यायी खाजगी इंटरनेट सेवा वापरावी, अशी मागणी होत आहे.
वरिष्ठांकडे पाठपुरावा
आमची सर्व कामे ऑनलाईन चालतात. इंटरनेट सेवा विस्कळीत असेल तर कामे ठप्प होतात. त्यामुळे आम्ही आता खाजगी इंटरनेट सेवा वापरण्यास मिळावी, यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करीत आहोत.
एच. एम. मिर्झा
दुय्यम निबंधक, देऊळगाव राजा
पर्यायी सेवा वापरावी
दुुय्यम निबंधक कार्यालयातील इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत आहे. त्यामुळे दस्त नोंदणीचे कामकाज बंद पडत असून, नागरिकांना अनेक तास कार्यालयात थांबावे लागत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी खाजगी इंटरनेट सेवेचा पर्याय वापरणे गरजेचे आहे.
गोविंद वायाळ
माजी सरपंच, चिंचखेडा