नुकसान अनुदानाचे संथ गतीने वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:57 IST2021-02-18T04:57:14+5:302021-02-18T04:57:14+5:30
मंठा : येथील जिल्हाबँकेच्या शाखेकडून अनुदान वाटप संथ गतीने होत आहे. वेळेत अनुदान मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी तहसीलदार ...

नुकसान अनुदानाचे संथ गतीने वाटप
मंठा : येथील जिल्हाबँकेच्या शाखेकडून अनुदान वाटप संथ गतीने होत आहे. वेळेत अनुदान मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी तहसीलदार सुमन मोरे यांच्याकडे धाव घेवून तक्रारींचा पाढा वाचला.
खरीप हंगाम २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी नुकसानीचे सरसगट पंचनामे करुन अनुदान देण्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने झालेले नुकसान विचारात घेऊन महसूल प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले. पंचनाम्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात मंठा तालुक्यासाठी २८ कोटी रुपये अनुदान दिले. हे अनुदान नोव्हेंबर महिन्यात जिल्हा बँकांकडे वर्ग करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांची बँक म्हणणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने चार महिन्यानंतरही हे अनुदान पूर्ण वाटप केलेले नाही. काही खाजगी दलालांनी कमिशन घेवून अनुदान वाटपात हातभार लावण्यास सुरूवात केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एकीकडे शेतकऱ्यांना अनुदान वेळेवर मिळत नाही. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे महावितरणकडून कृषिपंपाचे कनेक्शन कट करण्यात येत आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी निवेदन देऊन तात्काळ अनुदान वाटप करावे, अशी मागणी केली. तसेच अनुदान वाटप होईपर्यंत बँकेच्या कामाची वेळ वाढवून द्यावी, बँक कर्मचाऱ्यांच्या शनिवार, रविवारच्या सुट्या रद्द कराव्यात, अशी मागणीही मोरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
२८ कोटी प्राप्त
शासनाकडून दुसऱ्या टप्प्यातील २८ कोटीचे अनुदान प्राप्त होऊन जवळपास महिना होत आहे. परंतु अद्याप पहिल्या टप्प्यातील अनुदान पूर्णपणे वाटप न झालेले नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील अनुदान वाटप कधी होणार हाच प्रश्न आहे.