आरोग्य केंद्राच्या परिसरात घाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:29 IST2021-09-11T04:29:51+5:302021-09-11T04:29:51+5:30
आरोग्य केंद्राची संरक्षक भिंत पडली अंबड : अंबड तालुक्यातील सुखापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची संरक्षक भिंत मंगळवारी पावसाने ...

आरोग्य केंद्राच्या परिसरात घाण
आरोग्य केंद्राची संरक्षक भिंत पडली
अंबड : अंबड तालुक्यातील सुखापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची संरक्षक भिंत मंगळवारी पावसाने पडली आहे. सुखापुरीसह परिसरात मंगळवारी पडलेल्या पावसाने नदीला पूर आला होत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूने नदी असल्याने पुराचे पाणी संरक्षक भिंतीला धडकले. यामुळे पुराच्या तडाख्याने संरक्षक भिंत पडली आहे. पुराचे पाणी आरोग्य केंद्राच्या परिसरात शिरल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तातडीने भिंत बांधून द्यावी, अशी मागणी होत आहे.
महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात
जालना : जालना - औरंगाबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनेकवेळा खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पुरामुळे ३० कुटुंबांना हलविले
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात पावसाने रौद्ररूप धारण केल्याने लागोपाठ दुसऱ्यांदा ढगफुटीसदृश पावसामुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. पिठोरी सिरसगाव येथील ३० कुटुंबांना गल्हाटी नदीच्या पुराचा धोका लक्षात घेऊन तरूणांनी रात्रभर मदतकार्य करत जिल्हा परिषद शाळेत हलविले.
गुंज येथे शिवमहापुराण कथेची कीर्तनाने सांगता
घनसावंगी : घनसावंगी तालुक्यातील गुंज येथे आयोजित केलेला श्रावणमास महोत्सवातील श्री शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची सांगता करण्यात आली. श्रावण मासमध्ये झालेल्या श्रीशिव महापुराण कथेत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कथाकार प्रभाकर महाराज गरुड यांनी कथेचे वाचन केले. शनिवारी सोनू महाराज साखरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता करण्यात आली. त्यांनी संत लक्ष्मण महाराज यांच्या अभंगावर कीर्तन केले. सोहळ्यासाठी काशिनाथ घुंगासे, ओंकार दुकानदार, कैलास कदम, प्रकाश बोटके आदींनी परिश्रम घेतले. दरम्यान, या कथा सोहळ्यामुळे गावात भक्तीमय वातावरण झाले होते.
रामनगर गाव रक्तक्षय मुक्तची तयारी सुरू
जालना : क्रांतिसिंह बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने रामनगर येथे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यात महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण जास्त असल्याचे संस्थेच्या निदर्शनास आल्याने संस्थेच्या वतीने सहाय्यक ट्रस्ट, मुंबई यांच्या सहकार्याने रामनगर हे गाव रक्तक्षय मुक्त करण्याच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. रामनगर येथे सहाय्यक ट्रस्ट, मुंबईचे प्रमोद शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन (रक्तशयमुक्त भारत) मोहिमेंतर्गत रामनगर गाव रक्तक्षयमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची घोषणा करण्यात आली. यावेळी सहाय्यक ट्रस्टचे प्रमोद शिंदे, अध्यक्ष विष्णू पिवळे, व्यवस्थापक उषा शिंदे आदींची उपस्थिती होती.