दिगंबरा... दिगंबराच्या... जयघोषात जन्मोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 01:22 IST2019-12-12T01:22:09+5:302019-12-12T01:22:16+5:30
दिगंबरा... दिगंबरा ... श्रीपाद वल्लभ... दिगंबरा, स्वामी समर्थ महाराजांचा जयघोष, भजगोविंद्म भजगोपालच्या निनादात जिल्हाभरात दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

दिगंबरा... दिगंबराच्या... जयघोषात जन्मोत्सव
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दिगंबरा... दिगंबरा ... श्रीपाद वल्लभ... दिगंबरा, स्वामी समर्थ महाराजांचा जयघोष, भजगोविंद्म भजगोपालच्या निनादात जिल्हाभरात दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त दिवसभर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त जुना जालना भागातील गणपती गल्लीस्थितीत दत्त मंदिरातून दत्त महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली.
जुना जालना भागातील नरिमाननगर, तुळजा भवानी नगर, तसेच भालेनगरी येथील स्वामी समर्थ केंद्रामध्ये परंपरागत पध्दतीने दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. नरिमान नगरमध्ये सकाळपासूनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दुपारी १२ वाजता जन्मोत्सवाचा पाळणा महिलांनी सामूहिक पध्दतीने सादर केला. यावेळी महिला भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती. गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाभरातील दत्त मंदिरांमध्ये गुरुचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाची सांगता गुरुवारी महाप्रसादाने होणार आहे.
गणपती गल्ली येथील दत्त मंदिरातून सायंकाळी पालखी काढण्यात आली. यावेळी सुधाकर लोखंडे, अॅड. विष्णू किनगावकर, किरण टाकळकर, प्रकाश वडगावकर, अनिल लोखंडे, प्रदीप जनगाडे, धनंजय याडकीकर, रवि कुलकर्णी, विनायक महाराज फुलंब्रीकर आदींची उपस्थिती होती.
जालना तालुक्यात रोहनवाडीजवळील भोलेश्वर बरडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दत्त जन्मोत्सव परंपरागत उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या सात दिवसांमध्ये गुरुचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी दत्त जन्मोत्सव परंपरागत पध्दतीने साजरा करण्यात आला. हे सर्व कार्यक्रम बरडी संस्थानचे मठाधिपती स्वामी सच्चिदानंद महाराज यांच्या मार्गदर्शनात झाले.