सलग चार तास पाठलाग करून डिझेल चोरणारे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:42 IST2021-01-08T05:42:54+5:302021-01-08T05:42:54+5:30
तालुका जालना पोलिसांची कारवाई : १० लाखांचा मुद्देमाल जप्त जालना : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांतून डिझेल चोरणाऱ्यांना तालुका ...

सलग चार तास पाठलाग करून डिझेल चोरणारे अटकेत
तालुका जालना पोलिसांची कारवाई : १० लाखांचा मुद्देमाल जप्त
जालना : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांतून डिझेल चोरणाऱ्यांना तालुका जालना पोलिसांनी सलग चार तास पाठलाग करून शिताफीने गुरुवारी ताब्यात घेतले. रमेश दगडोबा मगरे (३८ रा. राममूर्ती), संतोष शिवसिंग जोनवाल (२५ रा. सावरगाव हडप) असे संशयीत आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून १४० लिटर डिझेल व तीन कार असा १० लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या वाहनातून डिझेल चोरीचे प्रमाण वाढले होते. पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी डिझेल चोरी करणाऱ्यांना तातडीने अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. बुधवारी तालुका जालना पोलीस ठाण्यात डिझेल चोरी केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीवरून चोरट्यांचा शोध सुरू होता. बुधवारी रात्री जालना तालुक्यातील वाघ्रुळ परिसरात पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना काही जण पोलीस वाहन पाहून पळून जात होते. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून एकास वाघ्रुळ येथून ताब्यात घेतले. तर दुसऱ्याचा सलग चार तास पाठलाग करून त्याला धारकल्याण येथून ताब्यात घेतले. तर काही जण फरार झाले. त्यांच्याकडून १४० लिटर डिझेल व तीन कार असा १० लाख १२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बागुल, सपोनि संभाजी वडते, पोना उगले. पोकॉं जारवाल, पोकॉं चौरे, मोरे, चालक मोरे, होमगार्ड वाघ आदींनी केली.