मानदेऊळगाव (जि. जालना) : जालना ते राजूर मार्गावरील बावणे पांगरी गावाजवळ सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास मोटारसायकलला ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात एका मुलीसह दोन जण जागीच ठार झाले आहेत. एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे.
जालना तालुक्यातील पारेगाव येथील रहिवासी असलेले प्रशांत ताराचंद पवार (वय २५) व निकिता दिगंबर राठोड (वय २५), नंदिनी ताराचंद पवार (वय १८) हे तिघे मोटारसायकलवरून राजूर येथे दर्शन करून पारेगाव येथे जाण्यासाठी निघाले होते. ते बावणे पांगरी या गावाजवळ आले असता राजुरहून जालनाकडे जाणाऱ्या ट्रकने (एमएच. २०, एए. ७२३३) मोटारसायकलला (एमएच. २१, सीई. ४५०४) पाठीमागून जाेराची धडक दिली.
या अपघातात प्रशांत पवार व निकिता राठोड हे दोघे जागेवरच ठार झाले. नंदिनी पवार या गंभीर जखमी झाल्या. सर्वांना रुग्णवाहिकेद्वारे जालना येथील शासकीय रुग्णालय पाठवण्यात आले. प्रशांत पवार व निकिता राठोड या दोघांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान नंदिनी पवार यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निकिता राठोड ही मुंबई येथे पोलिस दलात शिपाई म्हणून कार्यरत होती. ती गावाकडे सुट्टीवर आली होती.