भांबेरी-हिरडपुरी रस्ता कामाच्या चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:42 IST2021-01-08T05:42:34+5:302021-01-08T05:42:34+5:30
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील भांबेरी ते हिरडपुरी या रस्त्याच्या खडीकरण व मजबुतीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला ...

भांबेरी-हिरडपुरी रस्ता कामाच्या चौकशीची मागणी
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील भांबेरी ते हिरडपुरी या रस्त्याच्या खडीकरण व मजबुतीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या कामाची चौकशी करून संबंधित अधिकारी व गुत्तेदारावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भांबेरी ते हिरडपुरी या रस्त्याचे दीड किलोमीटर अंतराचे खडीकरण व मजबुतीकरण कामासह एक नळकंडी पुलासाठी १९ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. नियोजित अंदाजपत्रकानुसार रस्त्याचे व पुलाचे काम करण्याऐवजी गुत्तेदार व अधिकाऱ्यांनी मलिदा लाटण्यासाठी बोगस कामाचा सपाटाच लावला होता. परंतु, हा प्रयत्न परिसरातील ग्रामस्थांनी हाणून पाडत रस्त्याचे काम बंद पाडले. परंतु, तरीही गुत्तेदार व अधिकारी चांगले काम करण्यासाठी धजावत नाहीत.
अंदाजपत्रकानुसार ४ इंच खडीचा लेअर वापरणे बंधनकारक असताना याठिकाणी १ ते २ इंच खडीचा लेअर असून, चांगली वाळू किंवा कचखडी वापरण्याऐवजी मातीमिश्रीत वाळू वापरली जात आहे. या निकृष्ठ कामाला ग्रामस्थांनी विरोध करूनही गुत्तेदार, अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही या निवेदनातून करण्यात आला आहे. या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा काम होऊ देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर भांबेरीतील ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.