सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केलेली वृक्षतोड नगरपालिकेने थांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:19 IST2021-01-13T05:19:41+5:302021-01-13T05:19:41+5:30
नागरिक संभ्रमात : नेमके काम उड्डाणपुलाचे की रस्त्याचे? परतूर : शहरातील मोंढा भागात सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केलेली वृक्षतोड ...

सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केलेली वृक्षतोड नगरपालिकेने थांबविली
नागरिक संभ्रमात : नेमके काम उड्डाणपुलाचे की रस्त्याचे?
परतूर : शहरातील मोंढा भागात सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केलेली वृक्षतोड नगरपालिकेने थांबविली आहे. ही वृक्षतोड उड्डाणपुलासाठी होत आहे की, रस्त्याच्या कामासाठी याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.
परतूर-आष्टी रेल्वेगेटवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. रेल्वे स्टेशन, आष्टी व पारडगाव या चौफुलीवर उड्डाणपूल होत आहे. याबरोबरच परतूर शहराकडे जाणाऱ्या मार्गावर बोगदा करण्यात येत आहे. या कामाला आता गती येत आहे. शहरातील रस्त्यावर काम करताना अडथळा निर्माण करणारी झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तोडण्यात येत आहेत. रविवारी मोंढा भागातील लिंबाचे महाकाय झाड यंत्राच्या साहाय्याने तोडण्यात येत होते. यावेळी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही झाडे तोडण्यास ना हरकत घेतली का? असे म्हणत झाडे तोडण्याची परवानगी दाखविण्याची मागणी केली. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आमच्या विभागाकडे सदरील झाडे तोडण्याची परवानगी असल्याचे सांगत या झाडांचे पैसेही भरले असल्याचे सांगितले. परंतु, वादावादीत वृक्षतोड थांबविण्यात आली आहे. दरम्यान, ही वृक्षतोड उड्डाणपुलाच्या कामासाठी करण्यात येत आहे की, रस्त्याच्या कामासाठी याबाबत नागरिक संभ्रमात आहेत.
परवानगीची मुदत संपली
परतूर शहरातील उड्डाणपुलाच्या कामासाठी वृक्षतोड करण्याची परवानगी सार्वजनिक बांधकाम विभागाने २०१९ मध्ये घेतली होती. आता ही परवानगीची मुदत संपली आहे, असे सांगून नव्याने परवानगी घेण्याच्या सूचना देत नगरपालिकेने ही वृक्षतोड थांबविली आहे.
विकासकामात अडथळा आणू नये : वाघमारे
या संदर्भात उड्डाणपुलाच्या कामावरील अभियंता वाघमारे म्हणाले, आम्ही दोन वर्षांपूर्वी परवानगी घेतली होती. या परवानगीचे नूतनीकरण करावे लागेल. मात्र विकासकामात अडथळा आणू नये, असेही वाघमारे म्हणाले.
३० दिवसांचीच मुदत - गवळी
न. प.चे मुख्याधिकारी सुधीर गवळी म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाने २०१९ मध्ये ३० दिवसांसाठीच परवानगी घेतली होती. या परवानगीचा कालावधी संपला आहे. नव्याने परवानगी घेऊन वृक्षतोड करावी, असेही गवळी यांनी सांगितले.
फोटो ओळ : परतूर शहरातील मोंढा भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केलेली वृक्षतोड नगरपालिकेने थांबविली आहे.