राजूरेश्वर जन्मोत्सव सोहळ्यावर ३१ जानेवारीनंतर निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST2021-01-10T04:23:13+5:302021-01-10T04:23:13+5:30
१५ फेब्रुवारी रोजी राजूरेश्वर जन्मोत्सव आहे. त्या दृष्टीने राजूरेश्वर मंदिराच्या पायथ्याशी दरवर्षी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यासह अखंड हरिनाम ...

राजूरेश्वर जन्मोत्सव सोहळ्यावर ३१ जानेवारीनंतर निर्णय
१५ फेब्रुवारी रोजी राजूरेश्वर जन्मोत्सव आहे. त्या दृष्टीने राजूरेश्वर मंदिराच्या पायथ्याशी दरवर्षी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यासह अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. जिल्ह्यात सर्वात मोठा सोहळा राजूरात साजरा केला जातो. कोरोना संकटामुळे प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध घातलेले आहेत. त्यामुळे सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी सप्ताह समितीच्या पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत जालन्यात बैठक झाली. यावेळी दानवे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, तहसीलदार संतोष गोरड यांच्याशी भ्रमणध्वनीवरून राजूरेश्वर जन्मोत्सव सोहळ्याबाबत चर्चा केली. यावेळी बिनवडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ जानेवारी नंतर शासनाच्या नियमात काय बदल किंवा सुधारणा होतात, ते पाहूनच नियोजन करता येईल, असे सांगितले.
राजूरेश्वर जन्मोत्सवानिमित्त राजुरात होत असलेल्या सोहळ्याला महाराष्ट्रातील नामवंत संत, महंत उपस्थित राहून कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करतात. अन्नदानाच्या पंगतीसुद्धा मोठ्या प्रमाणात उठतात. सोहळ्याला दररोज हजारो भाविकांची उपस्थिती राहते. जालन्यातील बैठकीला विष्णू सास्ते, सरपंच भाऊसाहेब भुजंग, शिवाजी पुंगळे, व्यवस्थापक गणेश साबळे, कार्यालयीन अधीक्षक प्रशांत दानवे, गजानन जामदार, श्रीरामपंच पुंगळे, आप्पासाहेब पुंगळे आदींची उपस्थिती होती.