आज १२ हजार ३३२ उमेदवारांचा फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:28 IST2021-01-18T04:28:09+5:302021-01-18T04:28:09+5:30

ग्रामपंचायत निवडणूक ; नऊ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात जालना : जिल्ह्यातील ४४६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक रिंगणात असलेल्या १२ हजार ३२२ उमेदवारांचा ...

Decision of 12 thousand 332 candidates today | आज १२ हजार ३३२ उमेदवारांचा फैसला

आज १२ हजार ३३२ उमेदवारांचा फैसला

ग्रामपंचायत निवडणूक ; नऊ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात

जालना : जिल्ह्यातील ४४६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक रिंगणात असलेल्या १२ हजार ३२२ उमेदवारांचा सोमवारी फैसला होणार आहे. सकाळी नऊ वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी जवळपास ८०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये संपली होती. ४७५ पैकी २६ ग्रामपंचायतींची बिनविरोध निवडणूक झाली तर ४७८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. ४४६ ग्रामपंचायतींच्या ३,६५३ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. १,४७९ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. सकाळपासूनच नागरिकांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. जिल्ह्यात ८२.३२ टक्के मतदान झाले आहे. सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यासाठी प्रशासनाने तालुकास्तरावर नियोजन केले आहे.

औद्याेगिक प्रशिक्षण केंद्र जालना, कै. भगवंतराव गाढे मंगल कार्यालय भोकरदन, तहसील परिसर मंठा, तहसील कार्यालय बदनापूर, जवाहर नवोदय विद्यालय आंबा, औद्याेगिक प्रशिक्षण संस्था घनसावंगी, तहसील कार्यालय जाफराबाद तर अंबड येथील तहसील कार्यालयात सकाळी नऊ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, अंबड येथे १५ टेबलवर मतमोजणी होणार आहे. मतमोजणी सुरळीत पार पडण्यासाठी ७०० पोलीस कर्मचारी, ४०० होमगार्ड व एक एसआरपीएफची कंपनी तैनात करण्यात आली आहे.

जालन्यात १४ टेबल, २१ फेऱ्या

जालना : तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींसाठी १४३१ उमेदवार रिंगणात आहेत. जालना शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात १४ टेबलवर मतमोजणीला सुरुवात होईल. प्रशासनाने नियोजन केले असून, २१ फेऱ्यात मतमोजणी होईल. तालुक्यातील चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. कडवंची, भाटेपुरी, खरपुडी, देवमूर्ती, रामनगर, कारला, बाजीउम्रद, पिरकल्याण आणि जळगाव या ग्रामपंचायतींच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टेंभुर्णी ग्रामपंचायतीकडे लक्ष

जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी सकाळी मतमोजणी सुरू होईल. मतमोजणीसाठी निवडणूक विभागाने नऊ टेबलची व्यवस्था केली आहे. प्रत्येक टेबलवर तीन कर्मचारी मतमोजणीचे काम करणार आहेत. आठव्या फेरीपर्यंत सर्व निकाल जाहीर केले जाणार आहेत. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सतीश सोनी, नायब तहसीलदार केशव डकले यांची उपस्थिती राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना केल्या जाणार आहेत.

९०१ उमेदवारातून ३९० सदस्य ठरणार

मंठा : तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसाठी सकाळी नऊ वाजता तहसील परिसरात मतमोजणीला सुरुवात होईल. ९०१ उमेदवारातून ३९० सदस्य निवडले जाणार आहेत. मतमोजणीसाठी १५ टेबल ठेवण्यात आले आहेत. ८५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाचे गणेश खराबे यांनी दिली.

भोकरदन येथे १७ टेबलवर मतमोजणी

भोकरदन : तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी निवडणूक विभाग सज्ज झाला असून, १७ टेबलवर मतमोजणी केली जाणार आहे. यासाठी १७ सुपरवायझर व ५१ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती तहसीलदार संतोष गोरड यांनी दिली. ७५४ जागांसाठी १ हजार ६६२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

परतुरात १३ फेऱ्या, दहा टेबलवर मतमोजणी

परतूर : तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी दहा टेबल लावण्यात आले असून, १३ फेऱ्यात ही मतमोजणी पार पडणार आहे. सकाळी ९ वाजता जवाहर नवोदय विद्यालय आंबा येथे मतमोजणी होणार आहे. यासाठी ६६ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बदनापूर येथे ४३१ जागांसाठी मतमोजणी

बदनापूर : तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींसाठी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मतमोजणीस सुरुवात होईल. १ हजार १९ उमेदवार रिंगणात असून, २० टेबलवर मतमोजणी होणार आहे. यासाठी १०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या ग्रामपंचायतींकडे लक्ष

जिल्ह्यातील टेंभुर्णी, तीर्थपुरी, वालसावंगी, पिंपळगाव रेणुकाई, धावडा, पारध, जळगाव सपकाळ, केदारखेडा, हसनाबाद, सिपोरा बाजार, आन्वा, वाकडी, वाटूर, आंबा, सातोना खु, पाटोदा, आखणी, खुराड सावंगी, भाटेपुरी, कडवंची, कडवंची, भाटेपुरी, खरपुडी, देवमूर्ती, रामनगर, कारला, बाजीउम्रद, पिरकल्याण, जळगाव, बाजार गेवराई, केळीगव्हाण, दाभाडी, पाथरवाला आदी ग्रामपंचायतींच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Decision of 12 thousand 332 candidates today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.