जालना : वीजबिलाच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केलेला असतानाही व्यवसायासाठी २५ लाख रुपयांची वीजचोरी करणाऱ्या जालन्यातील भागवत किसनराव बावणे याच्यावर महावितरणने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे बावणेवर मागील वर्षीही दीड कोटी रुपयांची वीजचोरी केल्याचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, सायंकाळपर्यंत आरोपी ताब्यात घेण्यात आलेले नव्हते.
जालना तालुक्यातील राजूर रोडवरील गुंडेवाडी शिवारात गट क्र.४९ मध्ये आरोपी बावणेची राजवर्धन ॲग्रो या नावाने व्यावसायिक वीजजोडणी आहे. वीजबिल थकल्याने महावितरणने २६ जून २०२२१ रोजी या ठिकाणचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केला होता. महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनार यांच्या पथकाने २५ एप्रिल २०२४ रोजी या ग्राहकाची तपासणी केली असता तो लघुदाब वाहिनीवर सर्व्हिस वायर टाकून व्यवसायासाठी वीजचोरी करताना आढळून आला. आरोपीने १ कोटी ४९ लाख ३ हजार वीजचोरी केल्याचे उघड झाले होते.याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुन्हा वीजचोरीमहावितरणच्या मान देऊळगाव शाखेचे कनिष्ठ अभियंता विशाल हिवरडे यांनी यावर्षी ७ फेब्रुवारी रोजी पुन्हा राजवर्धन ॲग्रो या ग्राहकाची तपासणी केली. आरोपी भागवत किसनराव बावणे हा व्यवसायासाठी वीजचोरी करताना आढळून आला. आरोपी बावणेने २५ लाख ५२ हजार ३८० रुपयांची ५७९३० युनिट वीजचोरी केल्याचे तपासात स्पष्ट झाले. कनिष्ठ अभियंता विशाल हिवरडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी भागवत किसनराव बावणे याच्यावर सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अद्याप पोलिसांनी आरोपी भागवत बावणे यास रात्री उशिरापर्यंत अटक केलेली नव्हती.