पदाधिकारी, ग्रामस्थांच्या प्रयत्नातून दहिफळ गाव कोरोनामुक्त, तीन महिन्यांपासून रुग्ण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:33 IST2021-08-24T04:33:41+5:302021-08-24T04:33:41+5:30
जालना : सर्वसामान्यांची झोप उडविणाऱ्या कोरोनाला गावातून हद्दपार करण्यात दहिफळ (ता. जालना) ग्रामस्थांनी यश मिळविले आहे. ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि ...

पदाधिकारी, ग्रामस्थांच्या प्रयत्नातून दहिफळ गाव कोरोनामुक्त, तीन महिन्यांपासून रुग्ण नाही
जालना : सर्वसामान्यांची झोप उडविणाऱ्या कोरोनाला गावातून हद्दपार करण्यात दहिफळ (ता. जालना) ग्रामस्थांनी यश मिळविले आहे. ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे मागील तीन महिन्यांपासून गावात एकही रुग्ण आढळलेला नाही.
१३०० लोकसंख्येच्या दहिफळ गावात गत दीड - दोन वर्षात २० जणांना कोरोनाची लागण झाली होती, तर चौघांचा मृत्यू झाला आहे. गावात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सरपंच मीरा मोहन राठोड यांनी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन कोरोना विरूद्धचा लढा उभा केला. गाव स्वच्छता, नियमित मास्कचा वापर करण्यासह लसीकरणावर भर देण्यात आला. मानेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गावात वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध समित्यांच्या माध्यमातून केलेल्या जनजागृतीमुळे आजवर तब्बल ९२ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. यापुढेही गावात कोरोनाचे रुग्ण आढळू नयेत, यासाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायत दक्षता घेत आहेत.
तालुक्यात प्रथम
दहिफळ गावातील ग्रामपंचायत आणि सर्वपक्षीय मंडळींनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गावाला कोरोनामुक्त केले आहे.
ग्रामस्थांचे प्रयत्न आणि प्रशासनाने दिलेली साथ यामुळे दहिफळ गाव कोरोनामुक्तीत तालुक्यात अव्वल आले आहे. तालुक्यात प्रथम
ग्रामपंचायतीने असे केले प्रयत्न
इतर जिल्ह्यातून, शहरातून येणाऱ्यांची तपासणी, गावात स्वतंत्र अलगीकरण केंद्र, बाधितांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध आणि उपचार यावर भर देण्यात आला.
कोरोना लढ्यात महत्त्वाचा विषय असलेल्या लसीकरणाची जनजागृती केली. आजवर गावातील ९२ टक्के नागरिकांचे लसीकरणही पूर्ण झाले आहे.
गाव कोरोनामुक्त करण्यात ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. गावातील सर्वपक्षीयांनी एकत्रित केलेले प्रयत्न आणि प्रशासनाची साथ यामुळे गाव कोरोनामुक्त झाले आहे. गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- मीरा मोहन राठोड, सरपंच
कोरोनाला गावातून हद्दपार करण्यासाठी ग्रामस्थांसह सर्वपक्षीयांचेही परिश्रम मोठे आहेत. शिवाय प्रशासकीय पातळीवरील वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून केलेल्या कामामुळे गाव कोरोनामुक्त झाले आहे.
-विजय राठोड, ग्रामसेवक
गावातील बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांचे अलगीकरण करण्यात आले. गरजेनुसार संबंधितांवर उपचार करण्यात आले. शिवाय लसीकरण वेळेत व्हावे, याकडेही आरोग्य विभागाचा अधिक कल राहिला आहे.
-डॉ. अतुल साटेवाड, वैद्यकीय अधिकारी